मुंबई – मुंबई इंडियन्स व पंजाब किंग्ज यांच्यातील सामना खेळाडूंच्या यशापयशाबरोबरच एका अनोख्या घटनेमुळे चर्चेत आला. या सामन्यात पंजाबचा प्रशिक्षक व दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्स याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला मात्र, सचिनने तसे होऊ दिले नाही व या दोन जुन्या मीत्रांनी एकमेकांना आलिंगन दिले.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मुंबई व पंजाब यांच्यातील सामना संपल्यावर ही घटना घडली. पंजाबने मुबईचा पराभव केल्यावर सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाप एकमेकांचे अभिनंदन करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा सचिनला तेथे पाहून ऱ्होड्सने त्याची भेट घेतली, त्याच्याशी हस्तांदोलन केले व लगेचच सचिनचे पाय धरण्याचाही त्याने प्रयत्न केला. मात्र, सचिनने त्याला पाया पडू न देता आलिंगन दिले.
जागतिक क्रिकेटमध्ये सचिनबद्दल अन्य संघातील खेळाडूंना कीती आदर व प्रेम आहे याचाच प्रत्यय चाहत्यांना हा क्षण पाहून आला. सचिनची ऱ्होड्सशी पहिल्यापासून घट्ट मैत्री आहे. पंजाब संघाचे प्रशिक्षक बनण्यापूर्वी ऱ्होड्स मुंबई इंडियन्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते. आता ते पंजाबचे प्रशिक्षक आहेत.