पुणे – अमित जगताप मित्र परिवार आयोजित चॅम्पियन्स करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत टेक महिंद्रा, मर्क्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्यफेरीत प्रवेश केला. पिंपरी-चिंचवड येथील टेल्को मैदानावर या लढती झाल्या.
पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत टेक महिंद्रा संघाने सीबीएसएल संघावर सहा धावांनी मात केली. यात टेक महिंद्रा संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 125 धावा केल्या. अमित जाधव (20) आणि अमितोष निखार (24) यांनी मिळवून दिलेल्या चांगल्या सुरुवातीचा फायदा टेक महिंद्राला घेता आला नाही. ही जोडी फुटल्यानंतर मधल्या फळीने निराशा केली. तळाच्या स्वप्निल सावगवेने नाबाद 22 धावा करून टेक महिंद्राला सव्वाशे धावांपर्यंत पोहोचविले. लक्ष्याचा पाठलाग करताना सीबीएसएलच्या निखिल जोशीने अर्धशतक ठोकले पण त्याला इतरांची साथ मिळाली नाही. त्यामुळे सीबीएसएल संघाचा डाव 19.4 षटकांत 119 धावांत आटोपला.
दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मर्क्स संघाने ऍकसेंचर संघावर सात गडी राखून सहज मात केली. ऍक्सेंचर संघाचा डाव 114 धावांत आटोपला. यानंतर प्रसाद गिरकरच्या अर्धशतकाच्या जोरावर मर्क्स संघाने विजयी लक्ष्य 14.1 षटकांत तीन गडींच्या मोबदल्यात साध्य केले.
संक्षिप्त धावफलक –
1) टेक महिंद्रा – 20 षटकांत 7 बाद 125 (अमितोष निखार 24, स्वप्नील सावगवे नाबाद 22, अमित जाधव 20, गणेश जी. 2-20, क्षीतिज आपटे 2-21) वि. वि. सीबीएसएल – 19.4 षटकांत सर्व बाद 119 (निखिल जोशी 55, केतन घाडगे 12, विवेक पद्मनावम 2-15, रजत भट्टलवार 2-21, शुभम कुकडे 2-18). सामनावीर – अमितोष निखार.
2) ऍकसेंचर – 20 षटकांत सर्व बाद 114 (स्नेहल खामणकर 38, आकाशसिंग नाबाद 19, राघव त्रिवेदी 2-13, दिनेश वाडकर 2-20, अभिषेक राय 2-28, प्रसाद गिरकर 2-17) पराभूत वि. मर्क्स – 14.1 षटकांत 3 बाद 116 (प्रसाद गिरकर नाबाद 58, राघव त्रिवेदी 36, चिन्मय कुर्वे 2-29). सामनावीर – दिनेश वाडकर.