वाघोली,(प्रतिनिधी) मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात दोन दुकान चालकांवर गर्दी जमवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शासनातर्फे पोलीस हवालदार बाळकृष्ण गाडेकर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार राजेंद्र पोपट परदेशी (वय – ३६, राहणार हांडेवाडी पुणे) याने रिलायन्स मार्ट नावाचा मॉल चालू ठेवून गर्दी जमवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय गणेश सुरेश शिंदे( वय- 34, रा. खांदवे नगर) याने शिवा अमृततुल्य हाऊस नावाचे चहाचे दुकान चालू ठेवून गर्दी जमवल्या प्रकरणी त्याच्यावर देखील लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी स्वतःहून माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मानकर यांनी केले आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईचा सामना संबंधित व्यक्तींना करावा लागेल याचा इशारा देखील मानकर यांनी दिला आहे.