दुबई – आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले होते. मात्र, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर या स्पर्धेचे यजमानपद त्यांच्याकडून काढून घेतले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अर्थात याबाबत अद्याप आशिया क्रिकेट समितीने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. याबाबत येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाणार असल्याचेही बोलले जात आहे.
या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. मात्र, या स्पर्धेत सहभागी होऊन पाकिस्तानमध्ये खेळण्याची तयारी बीसीसीआयने दाखवलेली नाही. या स्थितीत बीसीसीआय व पाकिस्तान क्रिकेट मंडळ यांच्यात वादही घडले होते. भारतातील केंद्र सरकार भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये स्पर्धा खेळण्यासाठी पाठवण्याची शक्यताही नाही. दोन्ही देशांतील तणावामुळे हे दोन संघ केवळ आशिया समितीच्या तसेच आयसीसीच्याच स्पर्धेत एकमेकांशी खेळतात. मात्र, आता इम्रान यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर तेथील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
इम्रान खान पंजाब प्रांतात एका मोर्चात सहभागी झाले होते. त्यावेळी एका हल्लेखोराने त्यांच्यावर एके-47 रायफलमधून गोळीबार केला. या घटनेत इम्रान यांना दुखापत झाली असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचारर सुरू आहेत. मात्र, या घटनेनंतर जागतिक क्रिकेटमधून अनेक देशांनी पाकिस्तानमध्ये स्पर्धा आयोजित करू नये असे म्हटले आहे. तसेच आशिया क्रिकेट समितीवरही आशिया करंडक आता कोणत्या अन्य देशात हलवायचा का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
…तर सुरक्षा कशी मिळेल
आशिया करंडक स्पर्धा अमिरातीत किंवा भारतात आयोजित करा अशी चर्चा सध्या समितीच्या सदस्यांमध्ये सुरू झाली आहे. जर पाकिस्तानचे माजी पंतप्रधानच त्यांच्या देशात सुरक्षित नाहीत तर क्रिकेटपटूंच्या सुरक्षेकडे कोण लक्ष देणार असा सवालही निर्माण झाला आहे. दरम्यान सध्या पाकिस्तानमध्ये आयर्लंडचा महिला संघ सराव करत आहे. घडलेल्या घटनेनंतर संघ मायदेशी रवाना होणार का, याबाबतही लवकरच जाहीर केले जाणार आहे. आयर्लंडचा महिला संघ पाकिस्तानशी तीन एकदिवसीय तसेच तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानात दाखल झाला आहे.