क्रिकेट कॉर्नर : युवाशक्‍ती

-अमित डोंगरे

क्रिकेटमध्ये सेकंड बेंच किती महत्त्वाचा असतो याची कल्पना यंदा अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतून बीसीसीआयला आली असेल. आजवर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी केवळ औपचारिकता म्हणून खेळाडूंना सल्ला देत होती. माजी कर्णधार राहुल द्रविडला या अकादमीचा संचालक केले आणि चित्रच बदलले. गुरू कोण आहे त्यावरच शिष्याची गुणवत्ता सिद्ध होते, असे म्हणतात हे खोटे नाही. 

यंदाच्या स्पर्धेत नवोदित खेळाडूंची कामगिरी पाहिली की आता वयाची पस्तीशी पार केलेल्या खेळाडूंपेक्षाही त्यांची उपलब्धी जास्त असल्याचेही समोर येते. आता प्ले-ऑफचे सामने सुरू आहेत. येत्या 10 तारखेला ही स्पर्धाही संपेल. पण त्यातील नवोदितांची कामगिरी कायम लक्षात राहणार आहे. यातूनच विविध राज्यांच्या संघांना नवे गुणवान खेळाडू मिळणार आहेत.

ज्या खेळाडूंनी गेली 12 वर्षे आयपीएल गाजवली त्यांच्या आयपीएलमधील निवृत्तीची वेळ जवळ आल्याचेही या स्पर्धेतून जाणवले. त्यात खरा शहाणा ठरला तो चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू शेन वॉटसन. बाकीचेही काही खेळाडू त्याच्याकडून समज घेत असाच निर्णय जाहीर करण्याची शक्‍यता वाढली आहे. केवळ ब्रेड ऍण्ड बटर म्हणून या स्पर्धेत देशाला महत्त्व न देता जे खेळाडू सहभागी होतात ते मात्र संघांकडून हकालपट्टी होईपर्यंत खेळत राहतील यात शंका नाही.

करोनाचा धोका असल्याने ही स्पर्धा यंदा भारताऐवजी अमिरातीत घेतली गेली. या स्पर्धेतील साखळी सामन्यांत सर्वच संघातील नवोदितांनी त्यांच्या प्रमुख खेळाडूंपेक्षाही जास्त भरीव कामगिरी करून आपली गुणवत्ताही सिद्ध केली आहे. आता प्रश्‍न आहे तो त्यांना आणखी मोठ्या व्यासपीठावर कधी संधी मिळणार. अर्थात, त्यांना आता डावलले गेले तर ते राज्य तसेच देशाच्या संघाचेच नुकसान ठरणार आहे.

देवदत्त पडीक्कल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, टी. नटराजन, रियान पराग, राहुल तेवतिया यांसारखे खेळाडू पुढे आले हेच या स्पर्धेचे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल. पडीक्कलने यंदाच्या मोसमात 14 सामन्यांत 30 पेक्षाही जास्त सरासरीने 472 धावा फटकावल्या. स्पर्धेत त्याने यंदा पदार्पण केले व पदार्पणातच चारशेपेक्षा जास्त धावा करणारा पडीक्कल पहिलाच फलंदाजही ठरला. विराट कोहलीपेक्षाही त्याच्याच संघातून खेळत तो यशस्वी ठरला. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेबाबत पाहिले तर पदार्पणातच अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय फलंदाजही ठरला.

मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमारही असाच या स्पर्धेतील कामगिरीमुळे थेट भारतीय संघाचे दार ठोठावणारा फलंदाज. त्याला आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी जरी भारतीय संघात स्थान मिळालेले नसले तरीही त्याची गुणवत्ता कमी आहे असे होत नाही. उलट त्याला संधी न दिल्यामुळे कदाचित निवड समितीसह भारतीय संघाचेही नुकसान होणार आहे. त्यानेही 14 सामन्यांतून 40 च्या सरासरीने 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

यंदाच्या स्पर्धेत प्ले-ऑफ गटात स्थान मिळालेल्या सनरायझर्स हैदराबादचा टी. नटराजनही एक इंडिया मटेरियल असलेला खेळाडू. त्याची वेगवान गोलंदाजी यंदाच्या स्पर्धेत कमालीची यशस्वी ठरली. त्याने यंदाच्या स्पर्धेत 31 या स्वप्नवत सरासरीने 14 बळी घेतले. खरेतर त्याच्या नावापुढे जास्त बळी दिसायला हवे होते. मात्र, काही सामन्यांत क्षेत्ररक्षकांनी फलंदाजाला दिलेली जीवदाने त्यांच्या संघाला तसेच नटराजनलाही महागात पडली. त्याच्याकडे जसप्रीत बुमराहच्या दर्जाचीच गुणवत्ता आहे. सातत्याने यॉर्कर टाकण्याची त्याची क्षमता अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरली.

मुंबई इंडियन्सचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन हे नाव तर आता सगळ्यांच्यात तोंडी येऊ लागले आहे. अफाट गुणवत्ता असलेला हा फलंदाज येत्या काळात इंडिया जर्सीमध्ये दिसला तरी नवल वाटणार नाही. राहुल तेवतिया, रियान पराग व इशान किशन यांनी यंदाच्या स्पर्धेत आपल्या फलंदाजीच्या जोरावर संघाला अत्यंत संकटाच्या स्थितीतही विजय मिळवून दिले आहेत. किशनने या दोन्ही खेळाडूंपेक्षा जास्त सरासरी देत आपली आक्रमकताही दाखवून दिली आहे. त्याने 12 सामन्यांतून 42 च्या भक्कम सरासरीने 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. एका सामन्यात तो 99 धावांवर बाद झाल्यानंतर ज्या पद्धतीने डगआऊटमध्ये निराश होऊन बसला होता, त्याचवेळी त्याच्यातील प्रामाणिक क्रिकेटपटू संपूर्ण देशाने पाहिला.

सामन्यातील आपल्या कामगिरीपेक्षाही संघाच्या विजयाचे मोल जाणणारे खूप कमी खेळाडू असतात व त्यात किशनचाही क्रमांक लागतो हे महत्त्वाचे. यंदाची स्पर्धा याच दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. विविध संघांतील स्टार फलंदाज किंवा खेळाडू वयाने मोठे होत आहेत व त्याचवेळी नवोदित खेळाडू आपल्या कामगिरीने प्रभाव पाडत आहेत. हीच भारतीय क्रिकेटच्या नव्या अध्यायाची नांदी ठरणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.