दिल्ली वार्ता : कॉंग्रेसने भक्‍कम भिंत बांधावी

वंदना बर्वे

कॉंग्रेसच्या नेत्या सुष्मिता देव यांनी ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाने कॉंग्रेसला पाडलेले खिंडार आता मोठ्ठ भगदाड झालं आहे. संधी मिळेल तो सदस्य या भगदाडातून बाहेर पडायला तयार आहे. त्यामुळे कॉंग्रेसने सर्व कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन भक्‍कम भिंत बांधावी.

सुष्मिता देव सोळाव्या लोकसभेमध्ये कॉंग्रेसच्या खासदार होत्या. यानंतर राहुल गांधी यांनी त्यांना अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या अध्यक्षपदी बसविलं. 2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या. यानंतरही त्या अध्यक्षपदी कायम होत्या.

महत्त्वाचा मुद्दा असा की, सुष्मिता देव यांना कॉंग्रेस का सोडाविसी वाटली? लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी दिली होती, मात्र त्या पराभूत झाल्या. तरीही महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहिल्या. देशात कॉंग्रेसचं सरकार आलं असतं तर कदाचित मंत्रिपदही मिळालं असतं. असं सगळं वातावरण असताना त्यांनी कॉंग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला.

अलीकडेच संपन्न झालेल्या आसाम विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाल्यामुळे राहुल गांधी यांनी स्थानिक नेत्यांवर नाराजी व्यक्‍त केली होती. या निवडणुकीत सुष्मिता देव यांचे चालले. त्यांनी ज्यांच्या नावाची शिफारस केली त्यांनी तिकीट दिले. यातील बहुतांश उमेदवार पराभूत झाले.

मुळात, आसाममध्ये गौरव गोगोई आणि सुष्मिता देव यांच्यात वर्चस्वाच्या मुद्‌द्‌यावरून शीतयुद्ध सुरू होतं. सुष्मिता देव या संतोष मोहन देव यांच्या कन्या. माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते, तर गौरव गोगोई हे आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांचे चिरंजीव. यामुळे वर्चस्वाची लढाई स्वाभाविक आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचे उमेदवार निवडून येतील. यात लॉटरी लागण्याची दाट शक्‍यता असल्यामुळे देव यांनी दीदींचा पदर पकडला असल्याची चर्चा आहे.

कॉंग्रेस आताही देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे आणि राहुल गांधी या पक्षाचे नेते आहेत. कॉंग्रेसचे बहुतांश निर्णय हे राहुल गांधी यांच्याकडूनच घेतले जातात. त्यामुळे राहुल गांधी यांनी पडद्यामागून हालचाली करण्यापेक्षा कॉंग्रेसची धुरा हाकायला पाहिजे.

राहुल गांधी यांनी भविष्याचा वेध घेता आता यंग ब्रिगेडची तुतारी न वाजविता निष्ठावंतांना सोबत घेऊन कॉंग्रेसची नवीन टीम बनविण्याची गरज आहे. सुष्मिता देव यांच्या तृणमुल प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर ममता बॅनर्जी यांची नजर कॉंग्रेसच्या असमाधानी नेत्यांवर आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अलीकडेच माजी मंत्री कपिल सिब्बल यांनी डिनर पार्टीचं आयोजन केलं होतं. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी यास हजेरी लावली. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षांची सक्षम आघाडी बनविण्याच्या मुद्द्यावर या मंडळींनी चर्चा केली.

सेंट्रल हॉल नसण्याचं दुःख 

भारताची नवीन संसद बांधण्याचं काम वेगाने सुरू आहे. मात्र, नवीन संसदेत “सेंट्रल हॉल’ नसणार. यामुळे आजी-माजी खासदारांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे. संसद भवनातील सेंट्रल हॉल हे असं एक ठिकाण आहे जेथे सर्व आजी-माजी मंत्री आणि खासदार येऊन बसतात. मंत्री आणि खासदारांना सहज भेटण्याची जागा म्हणजे “सेंट्रल हॉल’. अधिवेशनाच्या काळात दुपारच्या जेवणाला जवळपास सर्वच जण या ठिकाणी येतात. म्हणून अपेक्षित नेत्यांना सहज भेटता येते. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रपती याच “सेंट्रल हॉल’मध्ये दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना संबोधित करतात.

मात्र, नवीन संसदेत “सेंट्रल हॉल’ नसणार याचे शल्य खूप नेत्यांना आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून चालत आलेली व्यवस्था अचानक बंद होणार आहे. यामुळे अनेक नेते नाराज आहेत. ही नाराजी घालविण्यासाठी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी बैठक बोलाविली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.