क्रिकेट काॅर्नर | फिरकी गोलंदाजी पुन्हा भोवली

-अमित डोंगरे

भारतात आल्यापासून खरेतर इंग्लंड संघ संपूर्ण तयारी करून आल्याचे बोलले जात होते. आपल्याकडे येण्यापूर्वी ते श्रीलंकेत मालिका खेळले व आशियाई खेळपट्टीचा अनुभव घेत भारतात दाखल झाले. मात्र, अद्यापही त्यांना भारतीय फिरकी गोलंदाजी कशाशी खातात (माफ करा कशी खेळतात) ते समजलेले दिसत नाही. जो गरबा त्यांनी अहमदाबादच्या याच मैदानावर तिसऱ्या कसोटीत खेळला त्याचाच दुसरा अंक चौथ्या कसोटीतही सुरू झाल्याचे वाटू लागले आहे.

त्यांच्या एकाही फलंदाजाला अक्‍सर पटेल व रवीचंद्रन अश्‍विन यांची फिरकी गोलंदाजी भुताटकी वाटत असल्याचेच जाणवते. त्यांची सलामीची जोडी खरेतर आजवर चांगली खेळत होती. मात्र, भारतात आल्यावरच त्यांचा बॅडपॅच सुरू झाला. त्यातच सध्या अश्‍विन भरात असला तरीही नाणे अक्‍सरचेच चालत आहे. त्याची डावखुरी फिरकी इंग्लंडच्या भल्या भल्या फलंदाजांना डोकेदुखी ठरत आहे. असे का होते याचा विचारही त्यांनी नेटमध्ये सराव करताना तसेच व्हिडिओ रिप्ले पाहताना केला नसावा.

पटेल व अश्‍विन यांनी खेळपट्टीचा सुरेख वापर करत ऍक्रॉस द लाइन, क्‍लोज ऑफ द विकेट, अवे फ्रॉम विकेट अशा जागा बदलून अक्‍सरने गोलंदाजी केली. त्यामुळे एकच लाइन पकडून किंवा दिशा पकडून केलेल्या गोलंदाजीवर तू आधी का मी आधी, हाच खेळ इंग्लंडच्या फलंदाजांचा दिसून आला. बेन स्टोक्‍सने झळकावलेले अर्धशतक, तसेच डॅनियल लॉरेन्स, ऑलिव्हर पोप व जॉनी बेअरस्टो यांनी लढत दिल्याने त्यांना या कसोटीत पहिल्या डावात द्विशतकी धावसंख्या गाठा आली. अन्यथा त्यांना पुन्हा एकदा नीचांकी निराशा पहावी लागली असती.

कौतुक भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे वाटते. त्याने नवा चेंडू महंमद सिराज व इशांत शर्मा यांच्या हाती सोपवला आणी सिराजने बेअरस्टोला परत धाडले. त्यानंतर त्याने सर्वात प्रमुख बळी त्यांचा कर्णधार ज्यो रूटचा मिळवला आणी भारताच्या मार्गातील मोठा अडसर दूर केला.
बास इथे वेगवान गोलंदाजांचे कार्य संपले आणि दोन्ही बाजूने फिरकी गोलंदाजी सुरू झाली. अक्‍सर व अश्‍विन यांनी इंग्लंडचा एकही फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावणार नाही याची काळजी घेतली. त्यात स्टोक्‍सने जी खेळी केली त्याचे कौतुक करावे तितके थोडे आहे.

अक्‍सर पटेलकडे फारसा अनुभव नाही मात्र, त्याने स्ट्‌प टू स्टम्प गोलंदाजी करत फलंदाजांना रूमच मिळू दिली नाही. त्याची हीच खासियत त्याच्यातील गुणवत्ता सिद्ध करते. त्याने धमक दाखवताना पहिल्या दिवशी चक्क फ्लाईटेड चेंडूही टाकले व फलंदाजाला मोठे फटके मारण्याचे आमिष दाखवले व त्यातच इंग्लंडचे फलंदाज फसले. दुसरीकडे अश्‍विनने ऑफ व मिडल स्टम्पचीच दिशा पकडून गोलंदाजी केली व त्यावर अत्यंत अनाकलनीय शॉट सिलेक्‍शन इंग्लंडच्या फलंदाजांकडून घडले व त्यांची फलंदाजी पुन्हा एकदा गडगडली.

या सामन्यासाठी जी खेळपट्टी तयार केली त्यावर सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळत होती. इंग्लंडचा डाव संपल्यावर भारतीय संघाच्या डावातही जेम्स ऍण्डरसनने सलामीवीर शुभमन गिलला ज्या चेंडूवर बाद केले तो पाहिल्यावर लक्षात येते की या खेळपट्टीवर स्विंगही मिळत आहे. आता हा सामना रंगतदार होण्याची शक्‍यता आहे. भारतीय संघ पहिल्या डावात कशी फलंदाजी करतो यावर सामन्याचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. मात्र, तरीही इंग्लंड दुसऱ्या डावात भारतीय फिरकीचा सामना कसा करणार हे देखील महत्त्वाचे ठरेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.