शालेय परीक्षांबाबत महापालिका संभ्रमात

महापालिका मागणार शासनाला मार्गदर्शन

 

पुणे – करोनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळांचे वेळापत्रक कोलमडले आहे. या गोंधळातच शालेय वर्ष संपण्यास अवघे काही महिने शिल्लक राहिले असतानाच प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुलांच्या परीक्षा ऑनलाइन घ्यायाच्या की ऑफलाइन याबाबत महापालिकेचा शिक्षण विभाग संभ्रमात आहे.

या परीक्षा ऑनलाइन घ्यायच्या झाल्यास पालिका शाळांमधील केवळ 40 टक्‍के मुलांच्या पालकांकडे ऑनलाइन क्‍लासची सुविधा आहे. तर, परीक्षा ऑफलाइन घेतल्यास करोना प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडवावे लागणार आहेत. त्यामुळे आता महापालिका राज्य शासनाकडे याबाबत मार्गदर्शन मागणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त सुरेश जगताप यांनी दिली.

महापालिकेकडून शहरात 1 ली ते 12 वीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांमधील कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. पालिकेच्या सुमारे 287 शाळांमध्ये जवळपास 80 ते 90 हजार विद्यार्थी आहेत.

मागील संपूर्ण शैक्षणिक वर्ष करोनाच्या लॉकडाऊनमध्ये गेले. त्यामुळे शाळाच सुरू झाल्या नाहीत. तर, 5 वीच्या पुढच्या शाळा एक महिनाही भरल्या नाहीत. त्यातच, 2020-21 चे शैक्षणिक वर्ष संपण्यास अवघे दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे या दोन महिन्यांत अंतीम परीक्षा होतील असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, आता राज्यात पुन्हा करोनाचे रुग्ण वाढल्याने शाळा बंद केल्या आहेत, तर दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. परिणामी 1 ली ते 9 पर्यंतच्या मुलांच्या परीक्षा कशा घ्यायच्या यावरून महापालिकेचा शिक्षण विभाग अडचणीत आहे.

40 टक्‍के मुलांकडेच सुविधा
महापालिकेस 1 ली ते 9 वीपर्यंतच्या मुलांची ऑनलाइन परीक्षा घ्यायची झाल्यास, या मुलांमधील केवळ 40 टक्‍के पालकांकडेच मोबाइल तसेच ऑनलाइन शिक्षणाच्या इतर साधणांची सुविधा आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेतल्यास 60 टक्‍के मुलांना परीक्षाच देता येणार नाही. तर, ऑफलाइन परीक्षा घेतल्यास करोनाचा धोका वाढत असल्याने या साथीचा प्रसार होण्याची तसेच रुग्ण वाढत असताना पालक मुलांना परीक्षेसाठी पाठवतील का नाही याची कोणतीही शास्वती नाही.

परीक्षांबाबत सर्व बाबी लक्षात घेऊन राज्यशासनाकडे मार्गदर्शन मागण्यात येणार आहे. त्यानंतरच परीक्षा ऑनलाइन घ्याच्या की ऑफलाइन याबाबत निर्णय घेणे शक्‍य होणार आहे. त्याबाबतची आवश्‍यक ती कार्यवाही सुरू आहे.

– सुरेश जगताप, अतिरिक्‍त आयुक्‍त, पुणे महापालिका

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.