क्रिकेट कॉर्नर : हैदराबादची मिस्ट्री गर्ल

अमित डोंगरे

क्रिकेटच्या कोणत्याही सामन्यात पाठीराख्यांची गर्दी सातत्याने होतच असते पण त्यातही लक्षात राहतात ते सुपरफॅन. पूर्वीच्या काळी क्रिकेटपटूंसाठी मैदानात बॉलीवूड स्टार्स यायचे. त्यामुळे रवी शास्त्रींसारख्या तेव्हाच्या स्टार खेळाडूंनाही सेलब्रिटी स्टेटस मिळत होते. आजही चित्र तेच आहे फक्‍त त्यात काहीसा बदल झाला आहे. आता आयपीएल स्घांना पाठिंबा देण्यासाठीही अनेक मुली चीअर करण्यासाठी पुढाकार घेतात. काव्या मारन ही एक अशीच क्रिकेट चाहती.

सनरायझर्स हैदराबाद संघाची सीईओ असलेल्या काव्याचा हा आवडता संघ असणार यात शंका नाही. संघातील खेळाडूंना चिअर करण्यासाठी प्रत्येक सामन्याला उपस्थित असते. काव्या कलानिधी मारन हे या फॅनचे संपूर्ण नाव. नाव वाचून आश्‍चर्य वाटले असेल ना. कलानिधी मारन या माध्यम सम्राटाची ही मुलगी. कलानिधी हे मुरासोली मारन या राजकीय व्यक्‍तीचे पुत्र असून दक्षिणेतील प्रसिद्ध सन टीव्ही या माध्यमाचे ते संस्थापक संचालकही आहेत.

चित्रपट दिग्दर्शनासह अनेक व्यवसायांत त्यांनी जम बसवला आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाची मालकीही त्यांच्याकडेच आहे. पण मुलगी मात्र क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणारी असल्याने या संघाचे संपूर्ण व्यवस्थापनही तीच पाहते. केवळ क्रिकेटच नव्हे तर अन्य खेळांच्या स्पर्धांनाही ती आवर्जून उपस्थित असते.

हैदराबाद संघाची आयपीएल स्पर्धेतील वाटचाल फारशी सातत्यपूर्ण नाही. त्यांनी गेल्या 14 वर्षांच्या या स्पर्धेच्या इतिहासात केवळ एकदाच विजेतेपद मिळवले होते. दरवर्षी या संघाकडून अफलातून खेळाची अपेक्षा असते. मात्र, त्यांना प्रत्येक वेळी अपयशाचा सामना करावा लागला आहे. अर्थात, तरीही काव्याचे समर्थन कधीही कमी झाले नाही.

दुसरीकडे पाहिले तर ज्या स्टार्सनी आयपीएलच्या संघाची मालकी मिळवली आहे, त्यांनी संघाच्या अपयशानंतर अनेक दिग्गज खेळाडूशीही फारकत घेतली असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे. खुद्द बीसीसीआयचे अध्यक्ष व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांचे कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या अपयशामुळे प्रसिद्ध अभिनेता व संघ मालक असलेल्या शाहरूख खानशी बिनसले होते. अखेर गांगुलीला संघातून वगळण्यातही आले. राजस्थान रॉयल्सच्या अपयशानंतरही संघ मालक असलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही आपल्या संघातून अनेक दिग्गज खेळाडूंना बाहेर काढले होते.

मात्र, संघाची कामगिरी कितीही निराशाजनक झाली तरीही आजवर हैदराबाद संघाने कोणाची आयपीएल कारकीर्द संपवली नाही ते केवळ काव्याच्या क्रिकेटवरील व क्रिकेटपटूंवरील आदरयुक्‍त प्रेमामुळे. काव्याचे हैदराबाद संघाशी असलेले ऋणानुबंध तीन वर्षांपूर्वी सर्वप्रथम समोर आले. तेव्हापासून आजवर तिने संघातील कोणत्याही खेळाडूबद्दल कधीही टीका केली नाही, तसेच माध्यमांशी बोलताना आपला तोल ढळू दिला नाही. स्वतः माध्यम क्षेत्राशीच संबंधित असल्याने केव्हा, कुठे व काय बोलावे याचे भान तिला आहे. राजकीय नेत्यांसारखी बेधडक विधाने तिने आजवर कधीही केली नाहीत व आमच्या वक्‍तव्यांचा विपर्यास केला अशी सारवासारवही तिला कधी करावी लागली नाही.

तिने खेळावर व आपल्या संघावर सातत्याने विश्‍वास ठेवला आहे. याच विश्‍वासामुळे ती प्रत्येक लढतीला हजर असते व संघाची कामगिरी कशीही असो तिचा पाठिंबा व प्रोत्साहन कधीही कमी होत नाही. डायहार्ड फॅन हे असेच असतात. सामन्यागणिक त्यांच्या निष्ठा बदलत नाहीत. नाही तर अन्य क्षेत्रांकडे पाहिले तर यशापयशावर निष्ठा व श्रद्धा बदलत असतात. हीच काव्या आज हैदराबाद संघाची मिस्ट्री गर्ल म्हणून ओळखली जात असली तरीही तिच्या याच पाठिंब्याच्या जोरावर यंदाच्या स्पर्धेत हैदराबादचा संघ विजेतेपदाची दावेदारी करत आहे. यात यश आले तर त्याचे श्रेय काव्यालाही द्यावेच लागेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.