– अमित डोंगरे
भारतीय क्रिकेटमध्ये ज्यांचे नाव आजही अत्यंत आदराने घेतले जाते, त्यांचे क्रिकेटबाबतचे प्रत्येक मत प्रमाण मानले जाते त्या विक्रमादित्य सुनील गावसकरांनाही परवा महेंद्रसिंह धोनीची स्वाक्षरी घेण्याचा मोह आवरता आला नाही. चेन्नई सुपर किंग्जचा कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव झाल्यावर घरच्याच प्रेक्षकांसमोर आभार मानण्यासाठी धोनी सहकारी खेळाडू, तसेच संघ व्यवस्थापनातील सदस्यांसह चेन्नईच्या मैदानाला फेरी मारत होता.
त्यावेळी सीएसके मार्क असलेले टेनिसचे चेंडू तसेच चेन्नई संघाची जर्सीही प्रेक्षकांकडे सुपूर्द केली जात होती. यावेळी धोनीने गुडघ्याला आईसपॅक लावला होता व यातूनच तो गुडघ्याच्या दुखापतीने किती त्रस्त आहे हेच समजत होते. त्याच्या याच लढाऊ वृत्तीने भारतीय प्रेक्षकांनाच नव्हे तर जगभरातील क्रिकेटप्रेमींना भूरळ घातली आहे.
खुद्द गावसकरही त्याचे जबरदस्त फॅन बनले आहेत. मात्र, स्वतः एक मोठे क्रिकेटपटू तसेच सध्याचे प्रख्यात समालोचक असल्याने एकदम धोनीकडे त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी ते यापूर्वी कधी आले नव्हते. मात्र, हा विश्वविक्रमी कर्णधार यंदाच्या आयपीएल मोसमानंतर कदाचित आयपीएलमधूनही निवृत्ती घेईल व पुन्हा त्याला मैदानावर खेळताना पाहता येणार नाही हे लक्षात आल्यावर गावसकर सामन्याचे पारितेषिक वितरण संपल्यावर लगेचच धोनीकडे गेले व आपल्या समालोचनाच्या शर्टवरच त्यांनी धोनीला स्वाक्षरी करण्यास सांगितले.
धोनीने आधी आढेवेढे घेत नंतर स्वाक्षरी केली. यात धोनीने गावसकर यांच्याप्रती असलेला आदरही दाखवला व एक चाहते आहेत हे समजून घेत स्वाक्षरीही केली. या क्षणी मैदानावर प्रचंड जल्लोष झाला. एक गोष्ट यातून समोर येते की, स्वतः कोणताही खेळाडू कितीही महान असो दुसऱ्याची महानता मान्य करणे हेच मोठ्या खेळाडूचे लक्षण असते व तेच गावसकरांनी व धोनीनेही दाखवून दिले.