मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने अनपेक्षितपणे व्याजदर वाढ थांबविण्याचा निर्णय पतधोरणात घेतला आहे. या अगोदर सहा वेळा रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात अडीच टक्क्याची वाढ केली होती. त्यामुळे घर कर्जाचे व्याजदर वाढणार नाहीत आणि यामुळे घर विक्रीला चालना मिळेल असे बऱ्याच विकसकांनी बोलून दाखविले.
नाईट फ्रॅंक इंडिया या संस्थेचे अध्यक्ष शिशिर बैजल यांनी सांगितले की, गेल्या एक वर्षात घराच्या कर्जावरील व्याजदर साडेसहा टक्क्यावरून 8.75 टक्क्यावर गेले असले तरी घर विक्रीवर फारसा परिणाम जाणवलेला नाही. मात्र कमी किमतीच्या घराची विक्री कमी झाली आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर वाढ थांबवल्यामुळे आता घर विक्रीला आणखी चालना मिळण्याची शक्यता खुली झाली आहे.
ऍनारॉक या संस्थेचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले की, रिझर्व्ह बॅंक यावेळी व्याजदर वाढ करेल असे समजले जात असतानाच बॅंकेने समजूतदारपणे व्याजदर वाढ थांबविली आहे. बऱ्याच कंपन्यातील कर्मचारी काढून टाकले जात आहेत. त्याचबरोबर पगार वाढ कमी आहे. अशा परिस्थितीत कर्जावरील हप्ता देण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. रिझर्व्ह बॅंकेने घेतलेल्या या निर्णयामुळे घर घेतलेल्यांना आणि घेणाऱ्यांना मदत होईल असे ते म्हणाले.
एलआयसी हाऊसिंग फायनान्स या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक वाय विश्वनाथ गौड यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करून सांगितले की, नवीन आर्थिक वर्षात घर बांधणे आणि विक्री क्षेत्राला या निर्णयामुळे चालना मिळेल. त्याचबरोबर घर खरेदीचा निर्णय लांबणीवर टाकलेले ग्राहक घर खरेदीचा निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेतील.
कोलते पाटील डेव्हलपर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल तलेले म्हणाले की, यामुळे घरासाठीच्या कर्जावरील व्याजदर व्याजदर स्थिर होतील. ही या क्षेत्राच्या दृष्टिकोनातून जमेची बाजू आहे. याचा घर खरेदी करणाऱ्यांना आणि घर तयार करणाऱ्यांना सारखाच फायदा होईल. त्याचबरोबर स्वस्त घराची विक्री वाढण्यास मदत होईल.
अजमेरा रिऍल्टीचे वित्त अधिकारी नितीन बाविसी यांनी सांगितले की, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने घेतलेला हा निर्णय घरबांधणी क्षेत्राला मदत करणारा ठरणार आहे . घर बांधणी क्षेत्र विस्तारल्यास त्याचे अर्थव्यवस्थेतील योगदान वाढण्यास मदत होते.
एस राहेजा रिऍल्टी या कंपनीचे व्यवस्थापकी संचालक राम रहेजा म्हणाले की, घरासाठीच्या कच्च्या मालाच्या किमती वाढत असल्यामुळे व्याजदरात वाढ थांबवावी अशी आमची अपेक्षा होती. ही अपेक्षा रिझर्व्ह बॅंकेने पूर्ण केले आहे. त्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. जर रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर वाढ चालू ठेवली असती तर त्याचा या क्षेत्रावर आणखी परिणाम झाला असता.
व्हाईसरॉय प्रॉपर्टीजचे सायरस मोदी यांनी रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या पतधोरणावर आनंद व्यक्त केल. ते म्हणाले की, आता महागाई कमी होणार असल्यामुळे आगामी काळातही रिझर्व्ह बॅंक व्याजदर वाढीकडे दुर्लक्ष करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.