मुंबई – गेल्या आठवड्यात भारतीय रिझर्व्ह बॅंकेबरोबरच अमेरिकेच्या रिझर्व्ह बॅंकेने महागाई रोखण्यास प्राधान्यक्रम देऊन आक्रमक व्याजदर वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून शेअर बाजारात जोरदार विक्री होऊन शेअर बाजाराचे निर्देशांक घसरले.
सोमवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 872 अंकांनी कमी होऊन 58,773 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 267 अंकांनी म्हणजे 1.51 टक्क्यांनी कमी होऊन 17,490 अंकावर बंद झाला.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख सिद्धार्थ खेमका त्यांनी सांगितले की, जागतिक बाजारातून आलेल्या नकारात्मक संदेशामुळे भारतीय शेअर बाजारात विक्री झाली. अमेरिकेने व्याजदरवाढीचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर चीनमध्ये बांधकाम क्षेत्र मंदावले आहे. त्यामुळे पाश्चिमात्य आणि आशियाई शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले.
शेअर बाजारात विक्रीचा जोर इतका जास्त होता की आयटीसी आणि नेस्ले या दोन कंपन्या वगळता सेन्सेक्ससंबंधातील इतर 28 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घसरण नोंदली गेली. टाटा स्टील, एशियन पेंट्स, विप्रो, सन फार्मा, लार्सन अँड ट्यूबरो, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यानी सपाटून मार खाल्ला.
छोट्या कंपन्यांच्या शेअरचे भाव घसरल्यामुळे मिड कॅप 1.80 टक्क्यांनी तर स्मॉल कॅप 1.17 टक्क्यांनी कमी झाला. ग्राहक वस्तू, वित्त, बॅंकिंग इत्यादी सर्व क्षेत्राच्या निर्देशांकामध्ये घट नोंदली गेली. शेअर बाजारानी आज जारी केलेल्या माहितीनुसार शुक्रवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारानी 1,110 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.
याचा अर्थ देशातील संस्थागत गुंतवणूकदार आणि किरकोळ गुंतवणूकदार शुक्रवारपासून भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री करून नफा काढून घेत आहेत. अमेरिकेच्या व्याजदरवाढीच्या संकेतामुळे अमेरिकेबरोबरच इतर देशाच्या शेअर बाजारावर काही दिवस परिणाम होत राहण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली.