दिलासा ! ‘कोविशिल्ड’ लसीचा ब्रिटनला जाणारा साठा भारतासाठी उपलब्ध

नवी दिल्ली  – सीरम इन्स्टिट्यूटकडून ब्रिटनला पाठवला जाणारा कोविशिल्ड लसीचा साठा भारतासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे देशात 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी करोनावरील लसीच्या तब्बल 50 लाख डोसची व्यवस्था होऊ शकणार आहे.

सीरम आणि ऍस्ट्राझेनेका कंपन्यांमधील करारामुळे कोविशिल्डचे डोस ब्रिटनला पाठवले जाणार होते. मात्र, भारतातील करोनाबाधितांची वाढती संख्या आणि लसटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर ते डोस स्वदेशातच वापरण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. ते डोस आता 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी उपलब्ध केले जाणार आहेत. ते डोस खरेदी करण्याची प्रक्रिया सीरमशी संपर्क साधून तातडीने सुरू करण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे.

संबंधित डोसवर कोविशिल्डचे नव्हे; तर कोविड-19 व्हॅक्‍सिन ऍस्ट्राझेनेका या नावाचे लेबल असेल. भारताने 1 मेपासून करोना लसीकरणाची व्याप्ती आणखी वाढवली. त्यानुसार, 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. मात्र, लसींचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरण प्रक्रियेत अडथळे येत आहेत. त्यामुळे ताजी घडामोड देशासाठी दिलासादायक ठरणारी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.