देशात करोनाने लोक मरत असताना केंद्रीय आरोग्यमंत्री आंदोलनात सामील ? जाणून घ्या सत्य

नवी दिल्ली – देशात करोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. करोना रुग्णवाढीचा रोजचा आकडा ४ लाखांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था हतबल झाली आहे. ऑक्सिजन बेड, औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहे. सहाजिकच या परिस्थितीत देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. तेही ती जबाबदारी पार पाडत आहेत. त्याच अनेक त्रुटींमुळं त्यांच्यावर टीकाही होत आहे. त्यातच त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यावरून सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पश्चिम बंगालमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यातच निकाल लागल्यानंतर दोन-तीन दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार भडकला आहे. हा हिंसाचार ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसने भडकवल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर भाजप जुने व्हिडीओ आणि फोटोच्या आधारे हिंसा भडकविण्याचा प्रयत्न करत असल्याचं तृणमूलचं म्हणण आहे.

दरम्यान भाजपकडून पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा निषेध नोंदविण्यात येत आहे. देशभरातील भाजपचे नेते ममता बॅनर्जी यांचा निषेध नोंदवत आहे. तर अनेक सेलिब्रेटी बंगालमधील हिंसाचारावर बोलताना दिसत आहे. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा निषेध करतानाचा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा फोटो व्हायरल झाला आहे. मात्र हा फोटो जुना असल्याचं निदर्शनास आलं आहे.

२०१९ मध्ये तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रॅलीवर हल्ला करण्यात आला होता. त्याचा निषेध म्हणून भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यावेळी निषेध नोंदविला होता. केंद्रीयमंत्री हर्षवर्धन यांनी देखील त्या घटनेचा निषेध नोंदवला होता.  दिल्लीतील जंतरमंतर येथे त्यांचा निषेध करतानाचा तेव्हाचा फोटो आता व्हायरल झाला आहे. देशात लोक मरत असताना आरोग्यमंत्री आंदोलन करत फिरत असल्याचा दावा कऱण्यात आला आहे. मात्र हा फोटो मे २०१९ मधील असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.