लंडन – ब्रिटनमध्ये करोनाच्या विषाणूची नवीन प्रजाती सापडल्याच्या पार्श्वभुमीवर फ्रान्सने करोना चाचण्यांचे हजारो किट ब्रिटनच्या सीमेवर तातडीने पाठवून दिले आहेत. फ्रान्स आणि ब्रिटनदरम्यानच्या व्यवसायाचे प्रमुख केंद्र असलेल्या पोर्ट ऑफ डेवोर इथे ही किट लढाऊ विमानांमधून पाठवून देण्यात आली आहेत. ब्रिटनमधील फ्रान्सच्या दूतावासाने गुरुवारी ही माहिती दिली.
करोना विषाणूची नवीन प्रजाती आढळली असल्याचे ब्रिटनने जाहीर केले, तेंव्हाच युरोपातील बहुतेक देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना प्रवेश बंद केला आहे. त्यामुळे इंग्लिश खाडी ओलांडून ब्रिटनमध्ये जाऊ न शकलेले हजारो ट्रक चालक दक्षिण इंग्लंडमधील केंट इथे अडकून पडले आहेत.
त्यांचे हाल होऊ नये म्हणून प्रवासबंदी लागू होण्यापासून् 72 तासांपर्यंत कोविड-19 चाचणी निगेटिव्ह असलेल्या लोकांना ब्रिटनमध्ये परत जाता यावे यासाठी हा मार्ग फ्रान्सने खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. अडकून पडलेल्या ट्रक चालकांच्या कोविड-19 चाचण्यांसाठी हे चाचणी किट केंट इथे पाठवून देण्यात आले आहेत.