इस्लामाबाद – अमेरिकेचे पत्रकार डॅनिएल पर्ल यांचे अपहरण आणि हत्या केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या दहशतवाद्यांची सुटका करण्याचे आदेश सिंध उच्च न्यायालयाने दिले आहेत. अहमद उमर सईद शेख, फहाद नसीम, शेख अदिल आणि सलमान साकिब अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. या सर्व आरोपींना विदेश प्रवासास मनाई करण्यात यावी.
त्यासाठी त्यांची नावे “एक्झिट कंट्रोल लिस्ट’मध्ये समाविष्ट करण्यात यावीत, असे आदेशही सिंध उच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. हे आरोपी गेल्या 18 वर्षांपासून तुरुंगात आहेत. न्यायालयाकडून समन्स बजावल्यावर उपस्थित राहण्याची अट देखील तुरुंगातून सुटका करताना या आरोपींवर घालण्यात आली आहे.
तत्पूर्वी आरोपींना ताब्यात ठेवण्याचा सरकारला अधिकार असल्याचे असिस्टंट ऍटर्नी जनरलनी न्यायालयाला सांगितले. या चारही आरोपींना सिंध प्रांताच्या गृह विभागाने 28 सप्टेंबर रोजी दहशतवाद विरोधी कायद्याखाली ताब्यात घेतले होते.
डॅनिएल पर्ल यांच्या हत्येच्या घटनेच्या 18 वर्षांनंतर या वर्षी एप्रिल महिन्यात या आरोपींच्या अपिलांवर सुनावणी झाली आणि त्यानंतर शेख साकिब आणि नसीम यांची या प्रकरणी निर्दोष मुक्तता केली गेली. 1999 साली विमान अपहरण प्रकरणी केलेल्या वाटाघाटींदरम्यान ज्या तीन दहशतवाद्यांची भारताने सुटका केली होती, त्यात ओमर सईद शेख याचीही सुटका झाली होती. डॅनिएल पर्ल हत्या प्रकरणात तो देखील एक आरोपी आहे.
अपीलावर सुनावणी झाल्यावर शेख याची फाशीची शिक्षा बदलून 7 वर्षांच्या तुरुंगवास आणि 20 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा दिली गेली. फाशीची शिक्षा सुनावली गेल्यानंतर शेख याने 18 वर्षे तुरुंगात काढली आहेत. त्यामुळे त्याला सुनावली गेलेली 7 वर्षांची शिक्षा त्याने भोगली असल्याचे मानले गेले.
अमेरिकेकडून तीव्र नाराजी…
अमेरिकेतील “वॉल स्ट्रीट जर्नल’च्या दक्षिण आशिया खंडासाठी वार्तांकन करणारे 38 वर्षीय पत्रकार डॅनिएल पर्ल यांचे 2002 साली अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला होता. डॅनिएल पर्ल हे पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी गटांचे अल कायदाशी असलेल्या संबंधांबाबत शोधपत्रकारिता करण्याच्या कामगिरीवर पाकिस्तानमध्ये आले होते.
त्यांच्या हत्येवरून दोषी ठरवलेल्या ओमर सईद शेख याची शिक्षा रद्द करण्याच्या एप्रिल महिन्यातील निकालावर अमेरिकेतील प्रतिनिधीगृहातील विदेश व्यवहार विभागाशी संबंधित समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.