नवी दिल्ली – “कोविड इंडिया सेवा’ या ट्विटर हॅन्डलचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज सुरूवात केली. यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी भारतीयांशी थेट संवाद साधण्यासाठी संवादात्मक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. विशेषत: सध्याच्या कोविड -19 साथीच्या रोगासारख्या संकटग्रस्त परिस्थितीत अगदी कमी वेळेत पारदर्शक ई-शासन सेवा सक्षम करणे आणि नागरिकांच्या प्रश्नांना व्यापक प्रमाणात जलदगतीने उत्तर देणे हा यामागचा उद्देश आहे.
या सेवेच्या घोषणेबाबत बोलताना डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, काळाच्या ओघात विशेषत: गरजेच्या वेळी ट्विटर ही सरकार आणि नागरिकांसाठी संवाद साधण्यासाठी आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एक अत्यावश्यक सेवा ठरली आहे. या ट्विटर हॅन्डलमुळे प्रशिक्षित तज्ञ सार्वजनिक आरोग्याची अधिकृत माहिती त्वरित व्यापक प्रमाणात सामायिक करतील आणि नागरिकांशी संवाद साधण्यासाठी थेट माध्यम तयार करण्यात मदत होईल, असेही डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.