अहमदाबाद: देशभरात फैलावलेल्या करोनाची बाधा झालेल्यांची संख्या गुजरातमध्ये वाढतच आहे. त्या राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येने 2 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
महाराष्ट्र आणि दिल्लीपाठोपाठ गुजरात करोनाबाधितांच्या संख्येत देशात तिसऱ्या स्थानी आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत करोनाने 77 जणांचा बळी घेतला आहे. करोनाबळींच्या संख्येतही ते राज्य देशात तिसऱ्या स्थानावरच आहे. देशातील सर्वांधिक बळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. त्यापाठोपाठ मध्यप्रदेशचा क्रमांक लागला आहे. गुजरातमध्ये करोनाने सर्वांधिक कहर अहमदाबाद जिल्ह्यात केला आहे. त्या जिल्ह्यात राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक करोनाबाधित आढळले आहेत. त्याखालोखाल सुरत जिल्ह्यात 338 रूग्णांना करोनाची लागण झाली आहे. तर वडोदरा जिल्ह्यात 188 रूग्णांना करोनाचा संसर्ग झाला आहे.
अहमदाबाद जिल्ह्यात करोनाने 43 रूग्णांचा बळी घेतला आहे. गुजरातमधील 131 रूग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बाधितांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत असल्याने देशातील इतर राज्यांप्रमाणेच गुजरातलाही करोनाचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागत आहेत.