कोविड-19 विरोधी लस त्वरित उपलब्ध करावी – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली – देशातील कोविड -19 परिस्थितीचा आणि लस निर्मिती, वितरण आणि व्यवस्थापन सज्जतेचा आढावा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. देशात तीन लसी विकासाच्या प्रगत टप्प्यात आहेत, त्यापैकी 2 दुसऱ्या टप्प्यात आणि एक तिसऱ्या टप्प्यात आहे.

भारतीय वैज्ञानिक आणि संशोधन पथके अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, मालदीव, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंका या शेजारील देशांबरोबर सहकार्य करत असून संशोधन क्षमता मजबूत करत आहेत. बांगलादेश, म्यानमार, कतार आणि भूतानकडून त्यांच्या देशांमध्ये क्‍लिनिकल चाचण्यांसाठी विनंती केली जात आहे.

जागतिक समुदायाला मदत करण्याच्या प्रयत्नासाठी पंतप्रधानांनी सूचना केली की आपण लस वितरण प्रणालीसाठी लसी, औषधे आणि आयटी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न शेजारी देशांपुरते मर्यादित ठेवू नये तर संपूर्ण जगापर्यंत पोहोचवले पाहिजेत.

राष्ट्रीय तज्ञ गटाने राज्य सरकार आणि सर्व संबंधित हितधारकांशी सल्लामसलत करून कोविड -19 विरोधी लसीचा साठा, वितरण आणि व्यवस्थापनाचा सविस्तर आराखडा तयार केला आहे.

देशाची भौगोलिक व्याप्ती आणि विविधता लक्षात घेऊन लस उपलब्धता जलद गतीने करण्याचे निर्देश दिलेले आहे. लस वाहतूक, वितरण आणि व्यवस्थापनातील प्रत्येक पाऊल कठोरपणे उचलण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यामध्ये शीतगृह साखळी, वितरण नेटवर्क, देखरेख यंत्रणा, आगाऊ मूल्यांकन आणि वेल्स, सिरिंज इ.आवश्‍यक उपकरणे तयार करणे यांचा समावेश असावा.

लसीच्या वितरणासाठी निवडणुकांचे यशस्वी आयोजन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुभवाचा वापर करायला हवा, असेही पंतप्रधान म्हणाले. रुग्णसंख्येत घट झाल्याबद्दल आत्मसंतुष्ट न राहता सावधगिरी बाळगून महामारी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. आगामी सण उत्सवाच्या निमित्ताने सुरक्षित सामाजिक अंतर, मास्कचा वापर, नियमितपणे हात धुणे आणि स्वच्छता राखणे यासारखे कोविड प्रतिबंधात्मक उपाय सुरूच ठेवण्यावर त्यांनी भर दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.