– डॉ. दीपांजली पवार (मधुमेह तज्ज्ञ, सातारा)
जगात पसरलेला आणि सर्वांना घराघरात बंदिस्त करणारा करोना. डायबेटिस नसणाऱ्या लोकांच्यावर याचा गंभीर आणि मृत्यूपर्यंत नेणारा प्रवास फारसा प्रादुर्भाव दाखवित नाही. मात्र, डायबेटिसच्या लोकांवर याचा होणारा जलद आणि गंभीर परिणाम जगात चिंतेचा विषय बनला आहे. त्याचा डायबेटिस असणाऱ्या लोकांनी कसा मुकाबला करावा याचा थोडक्यात आढावा…
भारत सरकारने खासगी वैद्यकीय मधुमेह तज्ज्ञांना हाताशी धरून “कोविड-19′ बरोबर डायबेटिसचा कसा मुकाबला करावा, याची पत्रिका प्रसारित केली. त्याला आणि रिसर्च सोसायटी फॉर द स्टडी ऑफ डायबेटिस इन इंडियाच्या अनुषंगाने अधोरेखित करणार आहोत. ज्यांना टाईप एक प्रकारचा मधुमेह असणाऱ्यांची रक्तशर्करेची पातळी अतिजास्त होणे किंवा कमी होणे याची शक्यता जास्त आहे. त्याचप्रमाणे टाईप 2 प्रकारच्या मधुमेही रुग्णांमध्येही ही तीव्रता वाढू शकते. सद्यस्थितीत लॉकडाऊनमुळे घरी व्यायामाअभावी मर्यादा, आहारातील असंतुलन आणि सर्वांत महत्त्वाचे ताणतणाव, नैराश्यामुळे रक्तशर्करा पातळीत चढउतार जाणवू शकतात.
ताप, खोकला, अशक्तपणा, बडग्यासह खोकला, जुलाब ही कोविड 19ची लक्षणे आहेत. साधारणतः आठ दिवसांमध्येच रुग्णास श्वसनाचा त्रास जाणवू लागतो. धाप लागते, छातीत जडपणा जाणवतो. आयबुप्रोफेनची गोळी पूर्णतः टाळावयाची आहे. साधी पॅरासीटामोल चालेल. या आजारामध्ये एकंदरीत डायबेटीसच्या रुग्णांमध्ये यापेक्षा वेगळे लक्षण असू शकते. त्यांना दम, धाप हे न जाणवताही गंभीर आजार असू शकतो. डायबेटिसमध्ये रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत असल्यामुळे वेगळी लक्षणे जाणवू शकतात. डोकेदुखी, ताप, घशात खवखवणे हे सौम्य असू शकते. यामुळेच त्यांना इतरांपेक्षा जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.
खूप ताप असल्यास खोकला, दमा, धाप, श्वसनास त्रास जाणवू लागल्यास ताबडतोब कोविड-19 हॉस्पिटलमध्ये आंतररुग्ण विभागात पाठवावे. त्याचबरोबर ज्या रुग्णांनी 14 दिवसांपूर्वीपासून इतर देशात किंवा पुणे, मुंबई अशा शहरात प्रवास केला आहे याचा तपशील दिल्यास तसेच जे आरोग्य कर्मचारी कोविड-19 रुग्णांच्या संपर्कात आलेले आहेत व ज्यांना ताप, दमा, धाप, खोकला, श्वसनास त्रास, अशक्तपणा जाणवतो व जे रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत, अशा सर्वांना कोविड-19 हॉस्पिटलमध्ये पाठवू शकता.
डायबेटिसच्या रुग्णांनी घ्यावयाची काळजी
– त्रिस्तरीय मास्क वापरा.
– जनसंपर्क टाळा, क्वारंटाइन पाळा.
– मधुमेह, रक्तदाब, किडनीच्या आजार असल्यास त्या सर्व औषधांचे नियमित सेवन करा, इन्शुलिन व्यवस्थित घ्या.
– शक्य असल्यास आठवड्यातून दोनदा घरीच रक्तशर्करा पातळी तपासा
– गरम पाणी, अन्नपदार्थांचे सेवन करा. अतिजड, शिळे पदार्थ टाळा. आहाराच्या वेळा, पद्धत नियमित करा.
– सूर्यनमस्कार, योगासने करणे, घरी चालणे, दोरीच्या उड्या मारणे यासारखे व्यायाम करीत राहा.
– दर 15 मिनिटांनी पाणी प्या. स्वतःला निर्जलीकरणापासून वाचवा. भरपूर पाणी प्या. (किडनीच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाणी घ्या).
– सतत हात धुणे, साबणाच्या जास्तीत जास्त वापर करणे, सॅनिटायझर वापरणे हे पाळा. चेहरा, नाक, तोंडाला हात लावणे टाळा.
– टाईप 1 मधुमेह असलेल्या रुग्णांनी उलटी, मळमळ, पोटदुखीसारखा त्रास जाणवल्यास लघवीतील किटोनचे प्रमाण तपासावे. रक्तशर्करा वेळोवेळी तपासत राहावी. काहीही त्रास झाल्यास डॉक्टरांशी संपर्क करावा.
– स्वतःची स्वच्छता सतत सांभाळा.
– रक्तातील साखर कमी होण्याची लक्षणे जाणवल्यास त्वरीत 15 ग्रॅम साखर (अंदाजे 2- 3 मोठे चमचे) खा किंवा अशा वेळेस गूळ, गोड पदार्थ सरबत, चॉकलेटस, गोळ्या यांचे त्वरीत सेवन करा. पुढील औषधांच्या बदलांसाठी डॉक्टरांना संपर्क करा.
– भारत सरकारच्या आरोग्य सुविधांमुळे तुम्ही सद्यस्थितीत घरी राहूनही ऑनलाइन कन्सल्टेशनचा मार्ग स्वीकारू शकता. मात्र, काहीही त्रास होत असल्यास डॉक्टर, हॉस्पिटलशी संपर्क साधा. कोणत्याही परिस्थितीत रक्तशर्करा नियंत्रित ठेवल्यास कोविड 19 चे धोके आपण नक्कीच टाळू शकतो.
– सर्वात शेवटी पण अत्यंत महत्वाचे “मन चिंती ते वैरी न चिंती’. त्यामुळे सतत सकारात्मक विचार ठेवा. आनंदी हसत खेळत रहा. हे दिवसही निघून जातील. कुटुंबासमवेत डायबेटिस नियंत्रण करा, ही 2020 ची मधुमेहाची घोषणा खऱ्या अर्थाने साजरी होत आहे. चला, दररोज नव्या संकल्पाने, आनंदाने आणि मनापासून “कोविड-19′ चा संघर्ष जगून जिंकूया.