पिंपरी, दि. 18 (प्रतिनिधी) -भाजप सत्तेचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येताच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्घाटनाची घाई करण्यात आली. अर्धवट कामामुळे रहाटणीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाकून ठेवण्याची वेळ आली आहे. पुतळ्याच्या पार्श्वभिंतीच्या कामाचे निमित्त करून गेल्या पंधरा दिवसांपासून महाराजांचा पुतळा कापडाने चहुबाजुंनी झाकून ठेवला आहे. त्यामुळे तत्कालीन नगरसेवकांच्या मनमानी कारभाराबाबत रहाटणी गावात चर्चा सुरू आहे.
महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजपने रहाटणीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन 12 मार्च 2022 ला प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करुन घेतले. हा पुतळा उभारण्यासाठी तब्बल अडीच कोटींचा खर्च झालेला आहे. तरीही, सभोवतालची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. पुतळ्याची अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून महाराजांचा पुतळा कापडाने चारही बाजुंनी झाकून ठेवला आहे. त्यामुळे ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहेत. अर्धवट काम असताना उद्घाटनाची गडबडघाई कशासाठी केली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
पाच वर्षांत केवळ रस्ते विकासाची बोळवण
रहाटणीत सिमेंटचे रस्ते करण्यापलिकडे सत्ताधा-यांनी कोणतीही प्रभावशाली विकासकामे केली नाहीत. रहाटणी फाटा ते रहाटणी चौक, नखाते वस्ती ते बीआरटी मार्ग आणि रहाटणी गाव, गोडांबे चौक ते तापकीर मळा आणि पिंपरी गावात जाणारा एक या रस्त्यांवर सिमेंट कॉंक्रिटीकरण टाकण्यात आले. सिमेंटचे रस्ते करण्यासाठी तत्कालीन नगरसेवकांना पाच वर्ष कालावधी लागला. त्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे मनस्ताप सहन करावा लागला. पाच वर्ष रहाटणीकरांनी हा वनवास भोगला. आता कुठे रस्ते तयार झाले आहेत. निवडणुकीत दाखवण्यासारखे उठावदार काम नसल्यामुळे पुतळ्याच्या उद्घाटनाची घाई करण्यात आल्याचा आक्षेप स्थानिकांकडून होत आहे.