माजी गृहमंत्री दिलीप वळसे : पाणीपुरवठा योजनेच्या व ग्रामपंचायतच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
लाखणगाव –शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथे हायस्कूलची इमारत उभी राहिली असून एक कोटी रुपयांची पाणीपुरवठ्याची योजना ही सुरू होणार आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात विकासकामे पोंदेवाडी गावात झाली आहेत. कधीकाळी दुष्काळी असणारे गाव आज प्रगतीपथावर पुढे आहे, असे मत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
पोंदेवाडी येथे मामासाहेब मोहोळ शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी तसेच पाणीपुरवठा योजनेच्या व ग्रामपंचायतच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या प्रसंगी वळसे-पाटील बोलत होते. यावेळी माजी खासदार अशोक मोहोळ, माजी आमदार पोपटराव गावडे, बाजार समितीचे अध्यक्ष देवदत्त निकम, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, विष्णूकाका हिंगे, संजय गवारी, नंदा सोनावले, रामदास वळसे पाटील, रामदास जाधव, माजी उपसरपंच संदीप पोखरकर, उपसरपंच महेंद्र पोखरकर, माजी सरपंच जयसिंग पोंदे,
सदाशिव रोडे, मुख्याध्यापक संभाजी लोखंडे, अर्जुन महाराज वाळुंज, सोमनाथ वाळुंज, सुशांत रोडे, आनंद पोंदे, अशोक दुगड, पोपट रोडे, भाऊसाहेब पोंदे, संतोष पोखरकर, अमोल वाळुंज, विठ्ठल मखर, सदाशिव पडवळ, अशोक वाळुंज, संतोष वाळुंज, अमित दौंण्ड, निलेश पडवळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले की, पोंदेवाडी गावातील अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे की येथील जमिनीवरील पुनर्वसनाच्या शिक्के काढावेत. रांजणगाव एमआयडीसीचे शिक्के काढले आहेत. जुन्नर तालुक्यातील शिक्के काढले आहेत. भविष्यकाळात याबाबत योग्य निर्णय घेऊ. सध्या जनावरांमधे लम्पी नावाचा आजार आला असून जनावरांचा मृत्यू होऊ शकतो. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे वळसे पाटील यावेळी म्हणाले.