पिंपरी, दि. 18, (प्रतिनिधी) -गुंगीचे औषध देऊन मोकाट जनावरांना कत्तलीसाठी गाडीमध्ये घालून त्यांची चोरी करण्याचा संतापजनक प्रकार पिंपरी येथील सुदर्शन चौक येथे शनिवारी (दि.17) उघडकीस आला. समाजकंटकांनी तीन ते चार वर्षांच्या बैलाला भूल दिली. यामध्ये बैलाचा मृत्यू झाला. याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी करत गोरक्षकांनी पालिकेसमोर रविवार (दि.18) रोजी मृत बैलाला ठेऊन आंदोलन केले.
या आंदोलनामध्ये गोरक्षक अभिजीत चव्हाण, ऍड. मंगेश नढे, अमित कुदळे, अभिजीत शिंदे, गणेश मंजाळ, प्रतीक खराडे, दीपक मुंगसे, नितीन कुदळे, विठ्ठल जाधव, अक्षय खडांळे, सन्नी दहिभाते, युवराज पाटील, दिपक मुंगसे, विठ्ठव जाधव, आदित्य कदम, सतिश जारकड, ऋषी ढाकणे, मनोज वाघेरे, महेश शर्मा, साजन काडंगे, ऍलेक्स कांबळे, हितेश रामचंदानी, सागर चव्हाण, कुणाल पाटे, दर्शन शिंदे, महेश येळवंडे, महेश आढाव, कुणाल नाणेकर, शुभम यादव उपस्थित होते.
गौरक्षकांनी सांगितले की, पिंपरी येथे तीन ते चार मोकाट जनावरांना कत्तलीच्या उद्देशाने शनिवारी भुलीचे इंजेक्शन देऊन स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये गाय व वासराला पळवून नेले. याबाबतची माहिती गोरक्षक प्रदीप खराडे, गणेश मंजाळ व अक्षय खंडागळे यांना मिळाली. गोरक्षक घटनास्थळी पोहचले. यावेळी वासराची परिस्थिती गंभीर होती. याबाबतीत पशू वैद्यकीय अधिकारी अरुण दगडे, मानद पशू कल्याण अधिकारी चव्हाण यांच्यासोबत गोरक्षक प्रदीप खराडे, गणेश मंजाळ व अक्षय खंडागळे यांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पशू वैद्यकीय अधिकारी अरुण दगडे यांच्या मार्फत कोणतेही ठोस पाऊल उचलले न गेल्यामुळे बैलाचा मृत्यू झाल्याचा आरोप गोरक्षकांनी केला. या संतापजनक प्रकारानंतर शहरातील गोरक्षकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झालेली असून पशू वैद्यकीय अधिकारी अरूण दगडे यांचे निलंबन करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
एका महिन्यातील चौथी घटना
शहरात मोकाट जनावरे आहेत. या मोकाट जनावरांना काही समाजकंटक टार्गेट करत आहे. गाई-बैलांना भूल देऊन मोटारी घेऊन जाण्याचे प्रकार वाढले आहेत. एका महिन्यात असे प्रकार होण्याची ही चौथी घटना आहे. भोसरीतील घटनेप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. महापालिकेच्या पशूवैद्यकीय विभागाच्या कारभारा गोरक्षकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.