आरटीआयच्या रक्षणासाठी न्यायालयीन लढा

माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या बैठकीतील निर्णय : मंगळवारी आंदोलन

पुणे – केंद्रीय माहिती अधिकारतील प्रस्तावित बदलामळे होत असलेली गळचेपी रोखण्यासाठी पुणे शहर व परिसरातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी (दि.27) पुण्यात पार पडली. यामध्ये माहिती अधिकार कायदा कमकुवत करण्यासाठी केंद्र सरकारने उचललेल्या पावलांबाबत चिंता व्यक्‍त करण्यात आली. याला संघटितपणे विरोध करण्यासाठी येत्या मंगळवारी (दि.30) बालगंधर्व चौकात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच न्यायालयीन लढा देण्यासाठी सज्ज होण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

इलिझियम हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी, विवेक वेलणकर, ऍड. असीम सरोदे, मारुती भापकर, विनिता देशमुख, विश्‍वास सहस्त्रबुद्धे, विजय कुंभार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऍड. असीम सरोदे यांनी माहिती अधिकार कायद्यातील प्रस्तावित बदल हेच घटनाबाह्य असल्याचे मत व्यक्‍त केले. सर्वसामान्यांची सरकारशी लढण्याची हत्यारेच नामशेष करण्यासाठी केंद्र सरकारने ही पावले उचलली असल्याचा आरोप केला. त्याला संघटितपणे विरोध करणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीत माहिती आयुक्‍तांचा कार्यकाळ, त्यांचे वेतन, माहिती आयुक्‍तांच्या कार्यकाळाबाबत घेतलेला निर्णय हा माहिती अधिकार कमकुवत करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत, असे मत सर्वच वक्‍त्यांनी व्यक्‍त केले. केंद्र सरकारचे खरे रूप जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या प्रस्तावित बदलांची माहिती या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ही गळचेपी रोखण्यासाठी न्यायालयात दाद मागण्याचादेखील निर्णय घेण्यात आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)