“पुणे ट्रॅफवॉच’ नागरिकांच्या सेवेत

रस्त्यांची दैनंदिन परिस्थिती एका “क्‍लिक’वर मिळणार

नागरिकांनाही घेता येईल सहभाग

नागरिकांसाठी हे “पेज’ उपलब्ध करून देण्यात आले आहे. “चेंजभाई’या पेजवर नागरिकांना येणाऱ्या समस्या आणि उद्‌भवलेली परिस्थिती नोंदविता येणार आहेत. त्याचबरोबर समस्येवरचा “उपाय’देखील नागरिकांना यावर नमूद करता येणार आहे. या माध्यमातून एकत्रित होणारी तपशिलवार माहिती देखील पाहता येणार आहे. या सुविधेचा लाभ नागरिकांनी घ्यावा.

पुणे – दिवसेंदिवस शहरातील वाहतूक कोंडीमध्ये भर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील नागरिकांना शहरांतर्गत प्रवास करणे सोपे जावे, या हेतूने पुणे शहर वाहतूक विभाग, “चेंजभाई’, स्मार्ट सिटी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या “पुणे ट्रॅफवॉच’ या संकेतस्थळाचे शनिवारी उद्‌घाटन करण्यात आले. संकेतस्थळावर “फोटो ऑटो टॅगिंग’ असणारा देशातील हा पहिला प्रकल्प आहे.

शहरातील नागरिकांना रस्त्यांची दैनंदिन परिस्थिती एका “क्‍लिक’वर मिळावी, या हेतूने “पुणे ट्रॅफवॉच’ तयार करण्यात आले. नागरिकांना “ट्रॅफवॉच’द्वारे सुमारे 33 हजार फोटोंच्या माध्यमातून प्रमुख 47 रस्ते आणि 265 चौकांची माहिती मिळणार आहे.

याद्वारे नागरिकांना वाहतुकीचे “करंट स्टेटस’, खड्डे, सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग, पार्किंगचे नियम, बीआरटी लेन, साईनबोर्ड, तुटलेले फुटपाथ, पी1 पी2, नो-एन्ट्री, नो-पार्किंग आदी तपशिल पाहता येणार आहेत. यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन होणारे चौक, वॉटर लॉगिंग, अपघातांचे “ब्लॅक स्पॉट’, बेकायदा लावलेले बॅनर आदी बाबींमुळे नागरिकांना त्रास सहन कराव्या लागणाऱ्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. पुणेकर “डिजिटल’ बदल लवकर स्वीकारतात. या पेजच्या माध्यमातून नागरिकांना विशिष्ट ठिकाणांसह “लाईव्ह’ माहिती घेता येणार आहे. यामुळे नागरिकांना प्रवास करणे सोपे जाणार आहे, असे मत “चेंजभाई’च्या नवरिषम कौर यांनी व्यक्त केले.

पालखी मार्गाची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या “वेबपेज’ प्रमाणे “पुणे ट्रॅफवॉच’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. “पुणे ट्रॅफवॉच’वर “रिअल टाईम अपडेट’ असल्याने नागरिकांसाठी ही संकल्पना फायदेशिर ठरणार आहे. नागरिकांना या माध्यमातून रस्त्यावरची परिस्थिती पाहता येणार आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सकारात्मक गोष्टी करण्याचा वाहतूक विभागाचा प्रयत्न आहे.

– पंकज देशमुख, वाहतूक उपायुक्त

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)