शाळांच्या कॅन्टिनमध्ये पौष्टिक पदार्थच असावेत

अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना : डिसेंबरपर्यंतचा आराखडा तयार

पुणे – शासकीय, निमशासकीय तसेच खासगी शाळा आणि महाविद्यायांच्या कॅन्टिनमध्ये विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक पदार्थच असावेत, अशा मार्गदर्शक सूचना अन्न व औषध प्रशासनाने दिल्या आहेत. सध्या या ठिकाणी मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची माहिती प्रशासनाने मागविली असून त्यात बदलही सुचविण्यात आले आहेत. येत्या डिसेंबरपर्यंतच्या “स्कूल ऍन्ड कॉलेज फूड प्रोजेक्‍ट’चे वेळापत्रक प्रशासनाने सह आयुक्‍तांना पाठविले आहे.

या कार्यक्रमानुसार ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ वाटप केले जातात, अशा सर्व शासकीय, निमशासकीय व खसगी शाळांची यादी, त्या शाळांच्या मुख्याध्यापकांचे नाव व त्यांचे संपर्क क्रमांक मिळवायचे आहेत. त्यानंतर विभागाच्या नियोजित कार्यक्रमाची त्या सर्वांना कल्पना द्यावयाची आहे. त्याकरिता शाळेत हेल्थ टीम तयार करावयाची आहे. त्यामध्ये मुख्याध्यापक, शाळा समिती सदस्य, पालक प्रतिनिधी, कॅन्टिन चालक, पोषक आहारतज्ज्ञ विद्यार्थी व शाळा प्रतिनिधींचा समावेश असणे आवश्‍यक आहे. या सर्व कामाचा आढावा घेण्याची जबाबदारी अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

…म्हणून पाठविल्या सूचना
आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी आहार हा महत्त्वपूर्ण घटक आहे. संतुलित आणि सुरक्षित आहाराची उपलब्धता आणि अन्न सुरक्षेबाबत मुलांमध्ये जागृती कमी असल्याने आरोग्य समस्या भेडसावत आहेत. त्यात लठ्ठपणा व वजनवाढीच्या समस्या भेडसावत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना पोषक, पौष्टिक, स्वच्छ आणि सुरक्षित अन्न देता येईल, यादृष्टीने प्रशासनाने कार्यक्रम तयार केला आहे. केंद्रीय सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे हा कार्यक्रम सर्व शाळांमध्ये राबविण्यास राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वीच मान्यता दिली आहे.

काय म्हटले आहे प्रशासनाने
नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, बर्गर, पिझ्झा, चॉकलेट, आईस्क्रीम, तळलेले पदार्थ कमी खावेत. तर, मासे, अंडी असे पदार्थ साधारणपणे खा. फळे आणि भाज्या जास्त प्रमाणात खा आणि कडधान्ये, तृणधान्ये आणि दूध नियमितपणे पुरेशा प्रमाणात खाण्याचे सुचविले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)