नगरपंचायतीसमोर नगरसेवकांचे उपोषण 

पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर केली टीका

मंजूर कामे सुरू करण्याची केली मागणी ः नगराध्यक्षांसह मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

कामांची चौकशी व्हावी : पाटील

नगरपंचायतीत लोकप्रतिनिधी हे आपल्या पीए मार्फत हस्तक्षेप करत आहेत. त्यामुळे कामे मंजूर असूनही ती सुरू झालेली नाहीत. त्यातच स्थायी समितीच्या बैठकीस नगराध्यक्षा जाणूनबुजून उपस्थित राहात नाहीत. तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या कामांच्या निविदा जाणूनबुजून प्रसिद्ध न करणे, भूमीगत गटारे, कॉंक्रिट रस्ते व स्ट्रीट लाइटची कामे निकृष्ट झालेली आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी यावेळी केली.

नेवासा – शासनाचा निधी येऊनही नेवासा शहरात विकासकामे होत नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराच्या निषेधार्थ व रखडलेल्या विकासकामांना गती मिळावी, या मागणीसाठी आज क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या नगरसेवकांनी नागरिकांसह नगरपंचायत चौकासमोर उपोषण सुरू केले आहे.

उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. मुख्याधिकाऱ्यांना व नगराध्यक्षांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेवासा शहरातील बंदिस्त गटारींच्या कामांची निविदा मंजूर झाली आहे. या कामासाठी ठेकेदार नियुक्तीसाठी स्थायी समितीची बैठक झाली. त्यास नगराध्यक्षच अनुपस्थित राहिल्या. त्यामुळे फेर निविदा काढावी लागली. तसेच प्रशासकीय मान्यतेसाठी व तांत्रिक मंजुरीसाठी कामे पाठविलेली आहेत. त्यांचा आजपर्यंत कुठलाही पाठपुरावा झालेला नाही. त्यासंदर्भात नवा प्रस्ताव पाठवला जात नाही. प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची निविदा प्रसिद्ध केल्या जात नाही. त्यामुळे शहरातील विकासकामे मार्गी लागत नाहीत. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने योग्य भूमिका घेऊन बंदिस्त गटाराचे व इतर विकासकामे सुरू करावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

उपोषणात नगरसेवक लक्ष्मणराव जगताप, फारुक आतार, संदीप बेहळे, नगरसेविका अर्चना कुऱ्हे, अंबिका ईरले, योगिता पिंपळे, नगरसेवक सचिन वडागळे, जितेंद्र कुऱ्हे, अंबादास ईरले, महंमद टेलर, सतीश पिंपळे, मिलिंद नागे, जालिंदर गवळी, दीपक दुधे, नरूु लष्करे, महेश मापारी, राहुल देहाडराय, नारायण लोखंडे, बापूसाहेब गायके, ऍड. के. एच. वाखुरे, पी. आर. जाधव, सुनील धायजे, प्रभाकर गडाख, विनायक नळकांडे आदींसह नागरिक सहभागी झाले आहेत. बहुजन वंचित आघाडीचे नेते संजय सुखधान, ऍड. बन्सी सातपुते, शिवसेनेचे गोरक्षनाथ घुले, भाजपचे सुभाष पल्लोड, अनिल ताके, पोपटराव जिरे, सूर्यकांत गांधी, व्यापारी अशोकलाल गुगळे, अभयकुमार गुगळे, सागर गांधी, कृष्णा डहाळे, प्रकाश गुजराथी, बाळासाहेब पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)