पीकविमा हा शेतकऱ्यांच्या जीवनाचा प्रश्न : द्विवेदी 

नगर – पीकविमा हा शेतकऱ्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे. आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत आहोत. शेतकरी येणाऱ्या खरीप हंगामात समाधानी झाला पाहिजे. गाव पातळीवर काम करणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी सकारात्मक व माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून काम करा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.

कृषी विभागाच्या वतीने पंतप्रधान पीकविमा योजना कार्यशाळेप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी बोलत होते. यावेळी प्र. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विलास नलगे, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर एन. के. पंडा, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, जिल्हा समन्वयक विनायक पवळे उपस्थित होते.

द्विवेदी म्हणाले, सर्व बॅंकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. बॅंकेच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या रोषाला शासकीय यंत्रणेला सामोरे जावे लागते. जे उद्दिष्ट दिले आहे, ते पूर्ण करा. नियमित बसणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या. क्रॉप लोनच्या संबंधित एकही प्रस्ताव बाकी ठेवू नये. ज्या बॅंका काम करणार नाहीत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, असे प्रधानमंत्री योजनेचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकात प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी विलास नलगे म्हणाले, या योजनेंतर्गत वास्तवदर्शी दराने हप्ता आकारण्यात येणार असून, शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर खरीप हंगाम 2 टक्के व रब्बी हंगाम 1.5 टक्के, तसेच नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. पीकविमा प्रस्ताव बॅंकेत सादर करतेवेळी सर्व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपला अर्ज ऑनलाइन भरणे बंधनकारक आहे.

पीकविमा भरताना शेतकऱ्यांनी अर्जासोबत आधार कार्ड, सातबारा उतारा, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांचा करारनामा, सहमती पत्र, पेरणी घोषणापत्र, बॅंक पासबुक झेरॉक्‍स प्रत, प्रत्यक्ष इलेक्‍ट्रॉनिक साक्षांकन करणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांनी पीकविमा संरक्षण मिळवण्यासाठी 24 जुलै 2019 पर्यंत अर्ज सादर करावेत. प्रत्येक गाव पातळीवर शेतकऱ्यांसाठी आपले सरकार सेवा केंद्र सुरू केले आहे. त्यात जाऊन शेतकऱ्यांनी आपले ऑनलाइन अर्ज सादर करावेत. सूत्रसंचालन बाळासाहेब नितनवरे यांनी केले, तर आभार विनायक पवळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)