शेजाऱ्याने बलात्काराचा प्रयत्न करून पेटवलेल्या महिलेचा मृत्यू

तीन वर्षे त्रास दिल्यानंतर केला होता बलात्काराचा प्रयत्न

मुझफ्फरपूर: शेजाऱ्याने बलात्काराचा प्रयत्न करून पेटवून दिलेल्या महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. तिच्या शेजाऱ्यानेच या महिलेवर 8 डिसेंबर रोजी बलात्काराचा प्रयत्न करून नंतर पेटवून दिले गेले होते. त्यामध्ये ही महिला 50 टक्के भाजली होती.

तिला मुझफ्फरपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून तिला पाटण्यातील रुग्णालयामध्ये हलवण्यात आले होते. दोन दिवसांनी तिची प्रकृती अधिकच खालावली होती, असे अहियापूर पोलीस ठाण्याचे एसएचओ विकास राय यांनी सांगितले.

या प्रकरणात अटक केलेला दोषी रवी राय हा या महिलेला गेल्या तीन वर्षांपासून त्रास देत होता. त्याच्याविरोधातील तक्रारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले होते. त्यानंतर ही महिला घरी एकटी असताना आरोपीने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पण तिने प्रतिकार केल्यावर त्याने तिला पेटवून दिले होते. याबाबतची “एफआयआर’देखील दाखल झाली आहे.

या महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी नाझिरपूर या तिच्या गावात पसरताच तीव्र संतापाची लाट उमटली. जिल्ह्यात ठिकठिकाणी नागरिकांनी तीव्र आंदोलन केले. या प्रकरणी तात्काळ खटला चालवला जावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा दिली जावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पोलिसांच्या आश्‍वासनानंतर प्रक्षुब्ध जमाव शांत झाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.