cotton price – पांढऱ्या सोन्याचा जिल्हा अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा कापूस ओला झाला आणि दर घसरला. कापसाचा एमएसपी दर ७०२० रुपये क्विंटल असून शेतकऱ्यांचा कापूस हा व्यापारी ६३०० ते ६५०० रुपये दराने खरेदी करीत आहे.
अशातच मोजक्याच जिनिंग प्रेसिंग सुरू झाले. नाफेड आणि सीसीआयची खरेदीही जिल्ह्यात अद्यापही सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या घरी अद्याप ७५ टक्के कापूस पडून आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. काही पिकांचे नुकसान झाले तर हाताशी असलेल्या शेतमालाचा भावही घसरला. यवतमाळ जिल्ह्यात चार लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली.
सुरुवातीला अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले. यातून वाचलेला कापूस आता निघणे सुरू असतानाच नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना पुन्हा संकटाला समोर जावे लागले. गतवर्षी १२ हजार रुपये क्विंटल दराने खरेदी होत होता.
किमान १० हजार दर मिळावा ही मागणी
काही भागात कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. कपाशीचे अधिक नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर वेचणी करण्यात आली असून यंदा कपाशीला चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती.
मात्र सध्या कपाशीला कमी दर मिळत असून, उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान कापसाला किमान दहा हजार क्विंटल तरी भाव मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.