वडगाव मावळ – येथील वडगाव नगरपंचायत प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक दशरथ दुंदा केंगले यांनी त्यांच्या नगरसेवक पदाचा राजीनामा नगरपंचायतच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांच्याकडे दिला. मात्र केंगले यांनी त्यांचा राजीनामा आपल्याकडे न देता जिल्हाधिकारी यांच्याकडे द्यायला हवा, असे मुख्याधिकारी ओगले म्हणाल्या. त्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर होणार का, याबाबत शहरात उत्सुकता आहे.
दरम्यान, नगरसेवक केंगले निवडणुकीनंतर प्रभागात फिरकलेच नाहीत. करोनासारख्या भीषण संकटात देखील ते गायब असल्याची बातमी दैनिक प्रभातमध्ये प्रकाशित केली होती. या बातमीमुळे तीव्र पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर केंगले यांनी वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांच्याकडे राजीनामा दिला.
वडगाव नगरपंचायतीचे भाजपाचे नगरसेवक दशरथ दुंदा केंगले हे 2018 रोजीच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून विजयी झाले होते. नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीच्या हद्दीत अनेक विकास कामे करायची आहेत. प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक दशरथ केंगले यांनी त्यांचे घर भाडेतत्वावर देऊन ते भोसरी परिसरात राहत असल्याचे समजते. निवडणूक झाल्यापासून ते नागरिकांच्या सोयीसुविधा व प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी पुढे आलेच नाहीत. नगरसेवक केंगले यांचा मोबाईल बंद आहे.