नवी दिल्ली : कोरोनाची बाधा झालेल्या एम्सच्या निवासी डॉक्टरच्या पत्नीने आरोग्यपूर्ण बाळाला जन्म दिला.दाम्पत्याला कोरोनाची बाधा होऊनही त्यांना संसर्ग न झालेल्या बाळाला जन्म देण्याची ही पहिलीच घटना आहे. देशाच्या राजधानीत ही विस्मयकारी आणि आनंददायक घटना घडली.
एम्समधील हा कोरोनाबाधित डॉक्टर फिजिऑलॉजी विभागात कार्यरत आहे. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर काही वेळातच त्यांच्या पत्नीची चाचणी घेण्यात आली. त्यात त्यांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.
या मातेने सिझेरियन झाल्यानंतर शुक्रवारी रात्री आरोग्यपूर्ण बाळाला जन्म दिला. आमच्या डॉक्टरांनी या बाळंतपणाच्या काळात आचारसंहितेवे पूर्ण पालन केले. त्यांनी संसर्ग प्रतिबंधक वेश (पीपीई) परिधान केला होता. सर्व आयुधे निर्जंतुकीकरण केलेली होती. या डॉक्टरांच्या पथकाचे नेतृत्व डॉ. नीरजा बाटला यांनी केले, अशी माहिती एम्सचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. डी. के. शर्मा यांनी दिले.
आमच्या निवासी डॉक्टरांची कोरोनाबाधीत गर्भवती पत्नी दाखल होत असल्याचे समजताच आम्ही त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले. तेथेच कोविद 19 च्या वैद्यकीय व्यवस्थापन आचार संहितेनुसार तात्पुरते शस्त्रक्रियागृह उभारण्यात आले, असे त्यांनी स्पष्ट केले.