CoronaUpdate : करोना परिस्थितीवर नियंत्रणासाठी अजित पवारांची मोठी घोषणा

मुंबई – राज्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात दररोज ६० हजारहून अधिक रुग्ण वाढत असून आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण आला आहे. त्याचवेळी आरोग्य सुविधेअभावी मृत्यूदर वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.

करोनाविरुद्धची लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी करोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी देण्याची घोषणा अजित पवारांनी  केली आहे. ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत पुढचे पंधरा दिवस महत्वाचे असून याकाळात रुग्णांना बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन, रेमडेसिवीर आदीबाबी उपलब्ध करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करावी. या लढाईसाठी निधी आणि मनुष्यबळ कमी पडू दिले जाणार नाही, असा विश्वास अजित पवार यांनी दिला.

राज्यात रेमडेसीवीर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, रेमडेसीवीर औषध थेट रुग्णालयांना दिले जाईल. तिथेच गरजू रुग्णांना वापरले जाईल. यावर जिल्हाधिकारी नियंत्रण ठेवतील, असंही ते म्हणाले. तसेच अधिग्रहीत खासगी रुग्णालयांमधील सुविधांच्या खर्चास मंजूरी देण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात येतील, अशी घोषणाही अजित पवार यांनी केली.

दरम्यान रुग्णालयांची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी रुग्णालयांच्या ठिकाणचे ऑक्सिजन प्लॅंट, लिक्विड ऑक्सिजन प्लँट, हवेतून ऑक्सिजन तयार करणारे प्लॅंट गरज आणि उपलब्धतेनुसार तातडीने बसविण्यात यावेत. यासाठी राष्ट्रीय आरोग्य मिशन, सार्वजनिक आरोग्य विभाग, राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ), जिल्हा नियोजन योजनेतून निधी उपलब्ध करुन  दिला जावा. महाराष्ट्र नगरोत्थान योजना आणि जिल्हा नियोजन योजनेतून स्मशानभूमी विकासातंर्गत महानगरपालिका, नगरपालिकांना विद्युत दाहिन्या, गॅस दाहिन्यांसाठी निधी दिला जावा असे निर्देशही अजित पवार यांनी दिले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.