भयंकर परिस्थीती! बेड न मिळाल्याने करोना रुग्णाचा हाॅस्पिटलच्या दारातच मृत्यू; अहमदनगरमधील वेदनादायी घटना

अहमदनगर – बेड न मिळाल्याने करोना रुग्णाचा हाॅस्पिटलच्या दारातच मृत्यू झाल्याची वेदनादायी घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. करोनाची लागण झालेल्या श्रीरामपूर येथील अत्यवस्थ रुग्णाला उपचारासाठी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र बेड शिल्लक नसल्याने रुग्णालय प्रशानसाने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात जाण्यास सांगितले. नातेवाइकांनी रुग्णाला घेऊन संपूर्ण शहर फिरले मात्र कुठेही बेड उपलब्ध झाले नाही. अखेर पुन्हा जिल्हा रुग्णालयाकडे आणण्यात आले मात्र, तेथेच त्यांचा मृत्यू झाला.

याची माहिती नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला देऊन मृतदेह काढून आत घेण्याची विनंती केली. मात्र, यासाठीही तब्बल दोन तासांचा कालावधी लागला. तोपर्यंत मृतदेह वाहनातच असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. दरम्यान, बेड न मिळाल्याने पुण्यातीलही एका वृद्धाचा घरातच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

दरम्यान, राज्यात सर्व शहरांत बेड्सचा तुटवडा आहे. नगरमध्येही बेडची कमतरता भासत आहे. शहरातील सर्व खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड करोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी दिला आहे. त्यानुसार 3700 बेड उपलब्ध होणार आहेत. मात्र, त्यातील बहुतांश बेड आधीच फुल्ल झालेले आहेत. शिवाय त्यात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या बेड्सची संख्या देखील अपुरी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.