पाटना – देशात सध्या करोना संसर्ग थैमान घालत आहे. दररोज तीन हजारहून अधिक लोक मृत्यूमुखी पडत आहेत. चार लाखांहून अधिक रुग्ण दररोज आढळत असून आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. त्यात आता वाढत्या मृत्यूंमुळे स्मशान भूमीत गर्दी होत आहे. अनेक ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी गर्दी होत आहे. अंत्यसंस्कारासाठी सरकारने नियम लागू केले आहे. मात्र करोनाच्या दहशतीमुळे काही लोक अंत्यसंस्काराला देखील जात नाहीत. अशीच एक घटना समोर आली आहे.
बिहारमध्ये करोनाने मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह नदी शेजारीच बेवारस सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. या संदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
कटिहार येथील व्हिडीओमध्ये करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिका चालक पूर्णिया रोडच्या भसना पुलाखाली सोडून निघून जाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीत हा मृतदेह तिथल्या स्थानिक रहिवाशाचा असून अशोक चौहान असे व्हिडीओतील मृत व्यक्तीचे नाव असल्याचे समोर आलं.
शनिवारी रात्री या व्यक्तीचे करोनाने निधन झाले. मात्र त्यांच्या नातेवाईकांपैकी कोणीच मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले नाही. अखेरीस रुग्णवाहिका चालक मृतदेह भसना नदीच्या पुलाखाली सोडून निघून गेला. याप्रकरणी डीएम उदयन मिश्रा यांनी मृताच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत.