शिक्रापूर (प्रतिनिधी) : सणसवाडी येथे शिरूर तालुक्यातील सर्व प्रथम रुग्ण आढळून आल्यानंतर सणसवाडी प्रशासनाला गावामध्ये कोरोनाचा शिरकाव टाळण्यासाठी यश आलेले असताना आता चार महिन्यांनी पुन्हा सणसवाडीमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून दोघा स्थानिकांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
सणसवाडी (ता. शिरूर) येथे २४ मार्च २०२० रोजी शिरूर तालुक्यातील प्रथम कोरोना बाधित रुग्ण आढळून आला होता आणि शिरूर तालुका हादरून गेला होता. त्यावेळी संपूर्ण तालुका प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करून कोरोना आटोक्यात आणला होता. त्यांनतर अद्याप पर्यंत सणसवाडी मध्ये एकहि कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नव्हता.
त्यांनतर सध्या शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असताना वारंवार पुणे येथे ये-जा करत असलेल्या सणसवाडी येथील एका स्थानिक युवकाला सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्याने खबरदारी म्हणून स्वतः तपासणी केली असताना त्याचा कोरोना अहवाल ७ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला. तर सदर रुग्णाच्या सोबत नेहमी राहणाऱ्या त्याच्या नात्यातील एका व्यक्तीने त्याची तपासणी केली असता त्या व्यक्तीचा देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाने या दोघांच्या संपर्कातील दहा जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असून या दोघांच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींची माहिती घेण्याचे काम आरोग्य विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला परिसर फवारणी करून निर्जतुकींकरण करण्यात आला आहे.
नागरिकांनी खबरदारी घेत सहकार्य करावे…
सणसवाडी गावामध्ये देखील आता कोरोनाचा शिरकाव झाला असून ग्रामस्थांनी पूर्वी घेतलेल्या काळजी प्रमाणे योग्य खबरदारी घेत गर्दी करणे टाळावे, तोंडावर मास्क लावावा, विनाकारण घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सणसवाडीचे पोलीस पाटील दत्तात्रय माने यांनी केले आहे.