पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा कहर वाढतच चालला आहे. सोमवारी दिवसभरात 379 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामध्ये शहरातील 361 व शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या 18 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शहरातील आजपर्यंत बाधित रुग्णांची संख्या 7637 इतकी झाली आहे. तर 286 रुग्णांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या 4598 इतकी झाली आहे. तर 2340 रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून रोज शहरात तीनशेहून अधिक करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच शहरातील मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे.
जिल्हा रुग्णालयात दोन करोनाबाधित
पिंपरी सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात सोमवारी (दि. 13) दोन करोनाबाधित रुग्ण आढळले. बोपोडी, पिंपळे गुरव येथील हे रुग्ण आहेत. दोन ज्येष्ठ महिलांना “डिस्चार्ज’ देण्यात आला. बोपोडी येथील 65 वर्षीय महिला आणि पिंपळे गुरव येथील 73 वर्षीय पुरुषाच्या करोना चाचणीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. बाणेर येथील 60 वर्षीय महिला आणि नवी सांगवी येथील 66 वर्षीय महिलेला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. 5 करोना संशयित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले.
सध्या 52 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 44 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आत्तापर्यंत 104 जण करोनामुक्त झाले आहेत तर 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.