सोशल मीडियावर अफवा
लोणावळा – लोणावळा शहरात चार करोनाग्रस्त रुग्ण आढल्याची अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. या अफवामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र लोणावळा शहरात करोनाग्रस्त रुग्ण आढळल्याची बातमी ही केवळ अफवा असून, नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नंदापुरकर यांच्यासह नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि मुख्याधिकारी सचिन पवार यांनी केले आहे.
लोणावळा शहर पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असल्याने येथे केवळ आपल्या देशाच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत असतात. त्यामुळे लोणावळा शहराची संपूर्ण अर्थव्यवस्था ही एकप्रकारे पर्यटनावर अवलंबून असते. अशा परिस्थितीमध्ये “लोणावळा शहरात करोनाग्रस्त रुग्ण आढळला’ ही अफवा येथील पर्यटन उद्योगाला मोठ्या प्रमाणावर घातक ठरू शकते. गुरुवारी सकाळ पासूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोणावळा शहरात चार करोनाग्रस्त रुग्ण आढळल्याच्या अफवा पसरू लागल्याने नागरिकांसोबतच येथील व्यावसायिकांमध्ये देखील एकप्रकारे काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि मुख्याधिकारी सचिन पवार यांच्या सोबत याबाबत संपर्क साधला असता, त्यांनी या केवळ अफवा असून, अशाप्रकारे कोणीही करोनाग्रस्त लोणावळ्यात आढळला नसल्याचे सांगत नागरिकांनी असे अफवा पसरविणारे मॅसेज व्हायरल करू नये, असे आवाहन केले आहे. सोबतच खबरदारी म्हणून करोना सदृश्य आजाराबाबत कोणकोणत्या काळजी घ्यावी याची माहिती देणारी पत्रक वितरित करणार असल्याचे देखील मुख्याधिकारी पवार यांनी सांगितले.
करोनाबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये – नगराध्यक्षा जाधव
लोणावळा शहरात करोनाग्रस्त रुग्ण आढल्याची बातमी ही केवळ अफवा आहे. लोणावळा शहरातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात अद्यपी एकही करोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. हा व्हायरस केवळ परदेशातून येथे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य आरोग्य विभाग परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशावर लक्ष ठेऊन आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नंदापुरकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे लोकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता घाबरून जाऊ नये. तसेच प्रत्येकाने स्वतःची आवश्यक ती काळजी घ्यावी. सोबतच अफवा पसरविणारे खोटे मॅसेज अन्यत्र कोठेही प्रसारित करू नये, असे आवाहन नगराध्यक्षा जाधव यांनी नागरिकांना केले आहे.