लंडन – इंग्लंडमध्ये करोना विरोधी लस घेणाऱ्या नागरिकांमध्ये भारतीय वंशाच्या एका ज्येष्ठ दाम्पत्याचाही समावेश आहे. टाईन ऍन्ड वेअर येथील रहिवासी असलेले 87 वर्षीय डॉ. हरी शुक्ला आणि त्यांच्या 84 वर्षीय पत्नी रंजन शुक्ला यांना न्यूकॅसलच्या रूग्णालयात फायझर, बायोटेकच्या लसीचे पहिल्या दोन डोसचे इंजेक्शन दिले गेले.
गेल्या आठवड्यात ब्रिटनमध्ये “नॅशनल हेल्थ सर्व्हिस’च्या निकषांनुसार निवडल्या गेल्यानंतर त्यांना ही लस देण्यात आली. वयाची 80 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना प्राधान्याने लस देण्याचा निकष निश्चित झालेला असल्यामुळे डॉ. हरी शुक्ला यांच्या समवेत त्यांच्या पत्नीचीही या लसीच्या पहिल्या डोससाठी निवड झाली होती.
हरी शुक्ला आणि त्यांच्या पत्नी रंजन यांना कोविड -19 ही लस देण्यात आली, ही लस घेणारे न्यूकॅसल हॉस्पिटलमधील आणि जगातील पहिले दाम्पत्य बनले आहेत, असे न्यूकॅसल हॉस्पिटल्स “एनएचएस फाउंडेशन ट्रस्ट’ने सांगितले.