करोना लसीचे कोणतेही साइड इफेक्‍ट नाहीत; डॉ. रणदीप गुलेरिया यांचे स्पष्टीकरण

व्यवहार सुरळीत करायचे असतील तर न घाबरता लस घेणे आवश्‍यक

नवी दिल्ली – करोना विरोधी लस घेतल्यानंतर आपल्याला कोणतेही साइड इफेक्‍ट जाणवत नसून आपले काम नियमित सुरू आहे. आपण आताही एका मिटींगमध्ये सहभागी असल्याचे दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. शनिवारी लसीकरणाचे देशव्यापी अभियान सुरू करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनाही लस देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी सोमवारी ही प्रतिक्रिया दिली आहे.

करोना लसीचे साइड इफेक्‍ट असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. परदेशात काही लोकांचा मृत्यूही झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्या अनुशंगाने बोलताना डॉ. गुलेरिया म्हणाले की, लस दिल्यानंतर छोटे मोठे त्रास होत असतात. आपण कोणतेही औषध घेतले की ऍलर्जीक रिऍक्‍शन ही होतच असते.

अगदी क्रोसीन, पॅरासिटामॉल यासारख्या साध्या गोळ्यांनीही ते होते. मात्र त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही. करोना लसीमुळे हार्ट ऍटॅक येत नाही. अगंदुखी, जेथे लस दिली आहे तेथे थोडे दुखणे अथवा ताप येणे असे सामान्य साइड इफेक्‍टस आहेत. तेही दहा टक्केपेक्षा कमी लोकांमध्ये ते दिसतात.

गुलेरिया म्हणाले की, गंभीर साइड इफेक्‍टबाबत बोलायचे झाले तर शरीरावर चट्टे पडू शकतात. किंवा श्‍वास जड होणे असे होउ शकते. त्यामुळे भीती वाटण्याची शक्‍यता आहे. मात्र तरीही कोणी घाबरण्याचे काही कारण नाही. कारण असे काही झाले तर प्रत्येक ठिकाणी उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. साइड इफेक्‍ट दिसत असतील तर काय करायचे यावर उपाय करण्यासाठी सेंटरही सुरू करण्यात आले आहेत.

लोकांनी कोणतीही भीती न बाळगता लस घ्यावी असे आवाहन करताना गुलेरिया म्हणाले की, कोविडच्या संक्रमणातून आपल्याला बाहेर पडायचे असेल तर अगोदर मृत्यूदर कमी करावा लागेल. देशाची अर्थव्यवस्था रूळावर आणायची असेल तर कोणताही किंतू न बाळगता लस घ्यावी लागेल. जर आपल्याला शाळा पुन्हा सुरू करायच्या असतील, जनजीवन पूर्वपदावर आणायचे असेल तर पुढे येउन लस घ्यावी लागणार आहे. तरच सगळा गाडा सुरळीत होउ शकतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.