चीनने अरूणाचलच्या हद्दीत वसवले मोठे गाव

उपग्रह छायाचित्रावरून स्पष्ट झाली स्थिती

नवी दिल्ली – चीनने अरूणाचल प्रदेशच्या भारतीय हद्दीत एक नवीन गावच वसवले असल्याची बाब उपग्रह छायाचित्रावरून स्पष्ट झाली आहे. एका दूरचित्रवाणी वाहिनीला या ठिकाणची 1 नोव्हेंबर 2020 ला उपग्रहाद्वारे घेण्यात आलेली छायाचित्रे मिळाली असून ती त्यांनी आज प्रसारीत केली. हे बांधकाम भारतीय हद्दीत साडे चार किमी आत करण्यात आले आहे. चीनने भारतीय हद्दीत घुसून केलेल्या या मोठ्या बांधकामांमुळे भारताची चिंता वाढणार आहे.

हे गाव अरूणाचल प्रदेशाच्या अप्पर सुभानशीरी जिल्ह्यात वसवण्यात आले आहे. या भागावर चीनकडून वारंवार दावा केला गेला होता व तो दावा भारताने वारंवार फेटाळून लावला होता. त्या ठिकाणी दोन्ही सैन्यांमध्ये या आधीही मोठा संघर्ष झाला आहे. गेल्या वर्षी हे गाव वसवण्याचे काम चीनने केले आहे. तथापि त्याची माहिती भारतीय लष्कर किंवा गुप्तचर विभागाला झाली आहे किंवा नाही यावर मात्र अजून प्रकाश पडलेला नाही.

सदर वृत्तवाहिनीने विदेश मंत्रालयाकडे ही छायाचित्रे शहानिशा करण्यासाठी पाठवली होती. तथापि त्यांनी चीनने तेथे हे काम केल्याचा दावा नाकारलेला नाही. चीनने या भागात पायाभूत सुविधा उभारण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून हाती घेतल्याची आम्हाला कल्पना आहे असेही भारताच्या विदेश व्यवहार विभागाकडून सांगण्यात आले आहे.

भारत सरकारकडूनही या भागात पायाभूत सुविधांच्या उभारणीचे काम सुरू आहे असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. चीनच्या भारतीय हद्दीतील या घुसखोरी बद्दल भाजपचे या भागातील खासदार तापिर गाओ यांनी लोकसभेतही प्रश्‍न उपस्थित करून चिंता व्यक्त केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.