Corona Update : कुंभमेळ्यातील करोना चाचण्यांच्या अहवालातही गोलमाल

नवी दिल्ली – देशात करोनाची दुसरी लाट उदभवली असतानाच उत्तराखंडमध्ये कुंभमेळा पार पडला होता व त्यावर प्रचंड टीकाही झाली होती. आता त्याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हरिद्धारमध्ये कुंभमेळ्यादरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी चार लाख चाचणी अहवाल बनावट असल्याचा संशय उत्तराखंड आरोग्य विभागाने व्यक्त केला होता. यानंतर करण्यात आलेल्या तपासात एकूण एक लाख चाचणी अहवाल बनावट असून खासगी एजन्सीच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील वृत्त एका इंग्रजी दैनिकाच्या वेबसाइटवर देण्यात आले आहे.

या अहवालांतील पत्ते आणि नावे देखील काल्पनिक आहेत. तर एकाच घरातील अनेक लोकांकडून नमूने घेण्यात आल्याची बोगसच माहिती दिली गेली आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काही जणांनी खोटे फोन नंबरही दिले आहेत.

कानपूर, मुंबई, अहमदाबाद आणि इतर ठिकाणच्या लोकांनी एकच फोन क्रमांक दिला आहे. कुंभमेळ्यातील आरोग्य अधिकारी डॉक्‍टर अर्जून सिंह सेनगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन खासगी प्रयोगशाळांमधील नमुने एजन्सीने जमा करणे अपेक्षित होते. त्याचीही चौकशी सुरु आहे.

दरम्यान आरोग्य सचिव अमित नेगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सविस्तर तपास अहवाल हरिद्वारच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी अनियमितता आढळली असून जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिवसांनी सविस्तर अहवाल पाठवल्यानंतर आम्ही कारवाई करु.

या प्रकरणाची पूर्ण चौकशी केली जात असून पुढील नोटीस येईपर्यंत, सर्व एजन्सींचे देय थांबण्यात आल्याचे हरिद्वारचे जिल्हा दंडाधिकारी सी रवीशंकर यांनी सांगितले आहे. धक्कादायक म्हणजे एजन्सीकडून नमुने गोळा करण्यासाठी जबाबदारी देण्यात आलेले जण राजस्थानमधील विद्यार्थी आणि डेटा ऑपरेटर असल्याचे समोर आले आहे, जे कधीही हरिद्वारमध्ये आले नव्हते. नमुने गोळा करणारी व्यक्ती तिथे स्वत: उपस्थित असणे गरजेचे आहे. मात्र येथे तसे काहीच झालेले नाही.

उत्तराखंडला कुंभदरम्यान चाचण्या करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य सरकारने एकूण आठ एजन्सींना नमुने गोळा करण्याची जबाबदारी दिली होती. यावेळी नऊ एजन्सी आणि खासगी प्रयोगशाळांनी मिळून एकूण चार लाख चाचण्या केल्या. यामध्ये अँटिजन टेस्ट सर्वाधिक होत्या. याशिवाय राज्य सरकारच्या वतीनेही सरकारी प्रयोगशाळेत चाचण्या करण्यात आल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.