संशोधन : अपुऱ्या झोपेमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका

वॉशिंग्टन – कमी झोप घेण्याचा किंवा निद्रानाशाचा त्रास अनेकांना जाणवत असतो. पण अशाप्रकारे कमी झोप घेतल्यामुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे संशोधन समोर आले आहे.

केवळ हा एक विकारच नव्हे तर अपुऱ्या झोपेमुळे माणूस इतर अनेक रोगांना आमंत्रण देतो असेही या संशोधनात म्हटले आहे. आरोग्य क्षेत्रातील संशोधनाशी संबंधित जर्नल एल्सेवियर या मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखाप्रमाणे अपुऱ्या झोपेचा अन आरोग्याचा अगदी जवळचा संबंध आहे.

अपुऱ्या झोपेमुळे रक्‍तदाब हृदयविकार आणि स्ट्रोक अशा आजारांना व्यक्ती निमंत्रण देत असते. जेवढी झोप घेणे आवश्‍यक आहे त्याच्यापेक्षा एक तास जरी झोप कमी झाली तरी हृदयविकाराचा धोका 24% ने वाढतो असे या लेखात म्हटले आहे. गरजेपेक्षा कमी निद्रा घेतल्यामुळे म्हातारपण लवकर येते त्याशिवाय शरीरातील अँटीबॉडीज पन्नास टक्के कमी प्रमाणात तयार होतात. त्याशिवाय पुरेशा प्रमाणात सातत्याने झोप न घेणाऱ्या व्यक्तींच्या मनात आत्महत्येचे विचारही वाढू शकतात.

ओपन हार्ट या जर्नलमध्ये आलेल्या माहितीप्रमाणे त्यांनी ज्या 42 हजार हृदयविकार रुग्णांचा अभ्यास केला असता ज्या रुग्णांनी कमी झोप घेतली होती त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त प्रमाणात वाढल्याचा निष्कर्ष समोर आला. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीन या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहिती प्रमाणे दररोज सात तासापेक्षा कमी झोप घेणाऱ्या व्यक्‍तींमध्ये फ्लूचा धोका जास्त असतो. सध्याच्या करोनाच्या कालावधीमध्ये लोकांनी जास्तीत जास्त विश्रांती घेऊन झोपेचा कोटा पूर्ण करावा असेही सुचविण्यात आले आहे.

ज्या लोकांना निद्रानाशाचा विकार आहे. त्यांनी आपल्या मित्रांना आणि नातेवाइकांना विश्वासात घेऊन आपल्या समस्येची माहिती द्यावी. त्याशिवाय ध्यानधारणा सारखे उपाय योजून झोपेचा कोटा पूर्ण करावा. निद्रानाशाचा विकार असलेल्यानी कधीही एकटे झोपू नये. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा असेही या सर्व जर्नल्समध्ये सुचवण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.