ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. कणकवले यांची माहिती
महाळुंगे इंगळे- चाकण जवळील खराबवाडी (ता. खेड) हद्दीतील आरू वस्ती परिसरात करोना संशयित व्यक्ती आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, संबंधित व्यक्तीचा करोना तपासणी अहवाल बुधवारी (दि. 8) रात्री निगेटिव्ह आला असल्याचे चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. माधव कणकवले यांनी स्पष्ट केले.
संबंधित व्यक्तीचा करोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. करोनाबाबत तर्क-वितर्क असले तरी कोणीही घाबरून जावू नये, मात्र काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन डॉ. माधव कणकवले व चाकण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. नीलम पाटील यांनी केले आहे. लॉकडाऊन सुरु असल्याने येथील पोलिसांनी शहर व परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. येथील ग्रामीण रुग्णालय परिसर स्वच्छ करून तेथे व शहरात वावरणाऱ्या रुग्णवाहिकेवर जंतुनाशक फवारणी व धूळफवारणी करण्यात येत आहे.
- शेलपिंपळगाव परिसरात अफवांचे पीक
शेलपिंपळगाव (ता. खेड) या परिसरात दिल्लीवरून एक व्यक्ती आला असून, तो करोनाग्रस्त आहे, अशी अफवा पसरली आहे. त्यामुळे या भागात भीतीचे वातावारण निर्माण झाले आहे. मात्र, सबंधित व्यक्तीची आरोग्य विभागाने तपासणी केली असून, त्याविषयी काळजी करण्याचे कारण नाही. त्यामुळेनागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.