6 संशयितांपैकी चौघांचे रिपोर्ट निगेटिव्ह
पुणे -“करोना’बाधित देशांतून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग मुंबईसह देशातील सात विमानतळांवर सुरू आहे. दि.27 जानेवारी 2020 पर्यंत मुंबई विमानतळावर 3 हजार 997 प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले असून, त्यामध्ये 18 प्रवासी हे महाराष्ट्रातील आहेत. यातील आतापर्यंत 6 व्यक्तींना संशयित म्हणून रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून, चार व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
संशयितांमध्ये मुंबईमधील 5 प्रवाशांना सौम्य सर्दी व ताप असल्याने खबरदारी म्हणून कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यापैकी तिघांचे प्रयोगशालेय नमुने निगेटिव्ह आल्याचे एन.आय.व्ही पुणे यांनी कळवले आहे. तर पुण्यातील नायडू रुग्णालयात 2 प्रवाशांना तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथे एकाला भरती करण्यात आले आहे. या संशयितांचे नमुने एन.आय.व्ही. येथे पाठवण्यात आले असून, त्यातील एकाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित दोघांचे नमुने उद्यापर्यंत येणार आहेत.
31 डिसेंबर 2019 रोजी चीन देशातील वुहान शहरात नवीन करोना विषाणूचा उद्रेक घोषित करण्यात आला. त्यानंतर चीनच्या इतर शहरांतही या आजाराचे रुग्ण आढळले असून जपान, थायलंड, दक्षिण कोरिया, अमेरिका अशा इतर 11 देशानीही आजाराचे रुग्ण नोंदविले आहेत. “करोना’ विषाणूचा प्रादुर्भाव भारतात होऊ नये, यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रात उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
दरम्यान, “करोना’आजाराची लक्षणे आढळल्यास रुग्णांनी स्वत:हून आरोग्य विभागास कळवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
संशयित रुग्णाला विलगीकरण कक्षात भरती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही संशयित रुग्णाचे प्रयोगशाळा नमुना एनआयव्हीकडे पाठवताना तो एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम यांच्या परवानगीने पाठवणे आवश्यक आहे. हा आजार प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांमध्ये आंतर विभागीय समन्वयाची आत्यंतिक आवश्यकता आहे.