41 मृत्यूंची नोंद : 1331 नवीन रुग्णांची भर
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूने पुन्हा एक उच्चांक गाठला आहे. शहरात 41 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर करोना रुग्णवाढीनेही उच्चांक गाठला आहे. शहरात तब्बल 1331 नवीन रुग्णांची भर पडली आहे. यामुळे आतापर्यंतच्या एकूण करोनाबाधितांचा आकडा 61231 इतका झाला आहे.
महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरात 1331 रुग्णांची नोंद झाली. शहरातील 1265 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 66 रुग्णांना करोनाची लागण झाली. तर तब्बल 41 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.
महापालिकेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात पुन्हा एकदा आकड्यांच्या गोंधळाची कबुली देत 20 मृत्यू हे एक सप्टेंबरपासून झाले असून आज डॅशबोर्डवर अपडेट केले असल्याचे सांगितले आहे. पालिकेनुसार 41 पैकी केवळ 21च मृत्यू गेल्या 24 तासांमध्ये झाले आहेत. उर्वरित मृत्यू जुने आहेत. त्यामध्ये शहरातील 28 व शहराबाहेरील 13 रुग्णांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत शहरात 7532 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 1046 रुग्णांचाही समावेश आहे. दिवसभरात 1272 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 49923 इतकी झाली आहे. 2903 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.