पुणे – शहरातील बाधित संख्या मागील आठ दिवसांपासून झपाट्याने वाढल्यामुळे आज बाधित रुग्णसंख्येने तब्बल एक लाखांचा टप्पा पार केला आहे. तर, मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही 2 हजार 401 झाली आहे. शहरात नव्याने 1 हजार 764 बाधित सापडले आहेत. तर 1 हजार 188 बाधित करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, करोनामुळे आज 22 जणांच्या मृत्युची नोंद झाली.
ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीपासून शहरातील बाधित संख्या हळूहळू कमी होण्यास सुरवात झाली होती. त्यानंतर दहा दिवसांचे लॉकडाऊन केल्यामुळे बाधित संख्येत तब्बल 800 ते 900ने घट झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता.
मात्र, लॉकडाऊन शिथील झाले, उत्सवानिमित्त नागरिकांनी बाजारपेठा आणि रस्त्यांवर गर्दी केली आणि काही दिवसातच बाधित संख्या वाढू लागली. 26 ऑगस्टपासून वाढत असलेली बाधित संख्या आज 1800पर्यंत पोहचली असून एकूण बाधित संख्या 1 लाख 459वर पोहचली आहे.
गुरूवारी (दि.3) दिवसभरात 6 हजार 734 संशयितांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत 82 हजार 85 बाधित करोनामुक्त झाले आहेत. शहरातील बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सक्रीय बाधितांची संख्या आता 15 हजार 973 वर पोहोचली आहे. त्यातील 885 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 530 जणांना व्हेंटिलेटर लावले आहेत. तर, 355 बाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.