शिरूर (पुणे)- शिरूर तालुक्यातील पाबळ येथील मंडल अधिकाऱ्यास 15 हजार रुपयांची लाच घेताना पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी शिरूर तहसील कार्यालय आवारात रंगेहात पकडले.
अमोल निवृत्तीनाथ खोल्लम (वय 40) असे पकडण्यात आलेल्या मंडलअधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल हे तहसील कार्यालयात शिरूर तालुक्यातील पाबळ विभागाचे मंडल अधिकारी आहेत.
यातील 25 वर्षीय तक्रारदार यांची तक्रार होती. त्यावेळी अमोल यांनी तक्रारदार यांना गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच त्या संबंधित कारवाई न करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुरुवारी (दि. 3) दुपारी अमोल याना तडजोडीअंती तक्रारदार यांच्याकडून 15 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.