बेड न मिळाल्याने रुग्णालय परिसरात झाडाखाली आसरा घेतलेल्या करोना रुग्णाचा अखेर मृत्यू

चंद्रपूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याबरोबर रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाणही सातत्याने वाढत आहे. अशावेळी रुग्णालयात आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याचे पाहायला मिळते. राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजन मिळत नाही, रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. तर कुठे रुग्णालयात बेडच उपलब्ध नाहीत. अशातच बेड न मिळाल्याने काही काळ एका झाडाखाली आसरा घेतलेल्या कोरोना रुग्णाचा अखेर मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही दुर्दैवी घटना चंद्रपुरातील मुख्य शासकीय रुग्णालय परिसरात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंदनखेडा गावातील एक करोना रुग्ण उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आला होता. रुग्णालयाकडून त्यांना बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाइकांनी रुग्णालय परिसरातीलच एका झाडाखाली आसरा घेतला. ही घटना कळताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यंत्रणेला जागं केलं. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने बेड मिळवून दिला. पण उपचार सुरु करण्यापूर्वीच त्या रुग्णाचा मृत्यू झाला. वेळीच बेड उपलब्ध करु दिला असता तर रुग्णाचे प्राण वाचले असते. अशी वेळ अन्य रुग्णांवर आणू नका, अशी विनंती मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोग्य यंत्रणेला केलीय.

दरम्यान, चंद्रपूरात सक्रिय करोना रुग्णांची संख्या 14 हजारावर जाऊन पोहोचली आहे. रुग्णसंख्या वाढल्याने येथील रुग्णालयात बेड, इंजेक्शन, व्हेंटिलेटर आणि डाॅक्टरचाही तुटवडा असल्याचे पाहायला मिळत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.