पुणे : ब्युटी सलून सुरू ठेवणाऱ्या ब्युटी सेंटरवर डेक्कन पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भांडारकर रस्त्यावरील “व्हि.एल.सी.सी वेलनेस ऍन्ड ब्युटी सेंटर’ पोलिसांनी कारवाई केली आहे.
पुण्यासह राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यामध्ये केशकर्तनालयांचाही (कटींग सलून) समावेश होता. असे असूनही भांडारकर रस्त्यावरील “व्हि.एल.सी.सी वेलनेस ऍन्ड ब्युटी सेंटर’ हे ब्युटी सलून मात्र सुरू होते.
याबाबतची माहिती डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांना माहिती मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक शिल्पा लंबे, पोलिस उपनिरीक्षक अभिजीत कुदळे, संदिप जाधव, किशोर शिंदे, पोलिस कर्मचारी स्मिता पवार यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. त्यावेळी संबंधीत ब्युटी सलून हे सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
संबंधीत ठिकाणी ग्राहकांची नोंदणी करून त्यांना सेवा पुरविण्यात येत असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 188, 269, 270 व 34, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 (बी)यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे व परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलिसांनी ही कारवाई केली.